घरमुंबईकल्याणकरांचे दोन्ही बाजूंनी मरण खाली खड्डे वर मोडके वीज खांब

कल्याणकरांचे दोन्ही बाजूंनी मरण खाली खड्डे वर मोडके वीज खांब

Subscribe

कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्यावर देखील अशाच घटनेची चाहूल लागताना दिसत आहे. या रस्त्याच्या मध्यभागीच विजेचे पोल उभे आहेत.

कल्याण : खड्डे आणि त्यातून होणारे मृत्यू यामुळे कल्याण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या महिन्याभरात कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे पाच लोकांचा बळी गेला आहे. परंतु, तरीही प्रशासनाला जाग येताना दिसत नाही. येथील लोकांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत आहे. रस्त्यावर गाडी चालवताना कधी कुठल्या खड्यात पडून आपला मृत्यू होईल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. शिवाय, या रस्त्यांच्या मध्यभागी किंवा रस्त्यालगतच वीजेचे खांब असल्यामुळे पावसाळ्यात कधी कुठल्या घटनेला सामोरे जावे लागेल याची शक्यता नाही. कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्यावर देखील अशाच घटनेची चाहूल लागताना दिसत आहे. या रस्त्याच्या मध्यभागीच विजेचे पोल उभे आहेत. कुठल्याही क्षणी हे पोल खाली पडून दुर्घटना घडण्याची भीती येथील नागरिकांच्या मनामध्ये आहे.

दुर्घटनेतून न शिकणारे प्रशासन

गेल्या आठवड्यात ७ जुलै रोजी अशीच एक दुर्घटना कल्याण पूर्वेच्या नांदिवली रोडवर घडली. नांदिवली रोडच्या आर्या गुरूकूल शाळेजवळ एक विजेचा खांब रस्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकावर आडवा पडला. शिवाय, प्रचंड पाऊस पडत होता. त्यामुळे तेथे साचलेल्या पाण्यामध्ये पोलची विद्युत ऊर्जा जमा झाली आणि त्यामुळे परिसरातील एका पंधरा वर्षीय मुलीला शॉक लागला. तेथील स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन दोन लहान मुलांना शॉक लागला होता. त्यांना ताबडतोब कल्याण-डोबिंवली महापालिकेच्या शासकीय रूग्नालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर झाली. रस्यावर विजेचा खांब आडवा पडून दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता इथल्या मलंगगड रोडवरील नागरिकांना वाटत आहे. शिवाय, या रत्यावर मध्यभागी असणारे विद्युत पोल पुर्णपणे वाकून जीर्ण झाले आहेत. एखादा ट्रक किंवा चारचाकी गाडी या विद्युत पोलना ठोकून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. परंतु, तरीही प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.

- Advertisement -

रस्ता बनला पण पोल ‘जैसे थे’

गेल्या कित्येक वर्षांपासून मलंगगड रोडने ये-जा करणार्‍या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात तर ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?’ असे मिश्किल प्रश्न नागरिकांना पडत होते. अखेर कोट्यावधी रुपये मान्य होऊन येथील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. या चौपदरीकरणात कायदेशीरपणे नमूद केलेले रस्ते आणि वास्तवात बांधण्यात आलेले रस्ते यात तफावत आहे. तरी रस्ता एकदाचा बनतोय याचा आनंद नागरिकांमध्ये आहे. शिवाय, चार महिन्यांपासून नांदिवली येथील रस्ता बनवला गेला असता तरी त्याजागेवरील विजेचे पोल ‘जैसे थे’ आहेत. हे विजेचे पोल जीर्ण झाले असून वाकले आहेत. त्यामुळे कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
मलंगगड रस्त्याच्या मध्यभागी असणारे विद्युत पोल

पाच लोकांपैकी एकाचा मृत्यू इथेच

या महिन्याभरात खड्यांमुळे जीव गेलेल्यांपैकी एकाचा मृत्यू याच रोडवर झाला आहे. या रोडवरून नवी मुंबईच्या दिशेने जाणारा शॉर्टकट मार्ग आहे. शिवाय, नेवाली नाक्यावरून पुण्याच्या दिशेने जाता येते आणि मुंब्रा, ठाणे मार्गाकडेही जाता येते. त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रंचड वर्दळ असते. या मार्गावरील द्वारली गाव येथे सिंगल रस्ता असून मोठमोठे खड्डे या रत्यावर आहेत. त्यामुळे द्वारली गावात वास्तव्यास राहणार्या एका नागरिकाचा येथे मृत्यू झाला. घटना घडलेल्या याच ठिकाणी गेल्यावर्षी खड्ड्यांमुळे महाविद्यालयात जाणार्या एका तरूणीचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -