घरमुंबईप्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपार्‍यातून

प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपार्‍यातून

Subscribe

मुंबईत भाजपकडे उमेदवारी देण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनीच दिल्याचे सांगितले जाते. नालासोपारा मतदारसंघ तसा सेफ वाटत असल्याने एकनाथ शिंदे यांनी शर्मा यांना नालासोपार्‍यातून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शर्मा यांच्या उमेदवारीला सेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. प्रदीप शर्मा हे नालासोपर्‍यातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार, हे वृत्त ‘आपलं महानगर’नेच सर्व प्रथम दिले होते.

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपा महाआघाडीत 135-135 जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या भाजपचे 123 तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. भाजपाच्या विद्यमान 123 आमदारांपैकी अगदी मोजक्याच आमदारांना घरी बसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपानुसार आता भाजपाला तसे फक्त 12 जागांवरच नव्याने उमेदवार देता येणार आहेत. यात प्रदीप शर्मा यांना आपल्या कोट्यातून मुंबईतून उमेदवारी देणे भाजपाला शक्य होणार नाही. त्यामुळे शर्मा यांचे भाजपच्या तिकीटावर मुंबईतून निवडणूक लढवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासारखे नाही. त्यातून शिवसेनेत जाऊन निवडणूक लढवण्याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तोडगा काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

पालघरमध्ये सेनेचा आमदार आहे. उरलेल्या तीन मतदारसंघात ठाकूरांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ठाकूरांच्या ताब्यात असलेल्या तीन मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून येईल, याचा भाजपाला भरवसा वाटत नाही. वसई, नालासोपारा मतदारसंघात ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशी सामना करील असाही चेहरा भाजपाकडे नाही. त्यामुळे भाजप पालघर जिल्ह्यात तिसर्‍या जागेसाठी फारसा हट्ट धरणार असे दिसत नाही. नालासोपार्‍यातून शिवसेनेने शर्मांना मैदानात उतरवले तर मुख्यमंत्र्यांचीही त्याला संमती असणार आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पालघर जिल्ह्यावर पकड बसवायची आहे. त्यासाठी वसई विरार आपल्या ताब्यात घेण्याचे शिंदे यांचे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावीत यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून 26 हजार मते जास्त मिळाली आहेत. पण, विधानसभा निवडणुकीत ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला टक्कर देणारा उमेदवार सेनेकडेही नाही. शर्मा शिवसेनेत यायला तयार झाल्यानंतर शिंदे यांनी त्यांना नालासोपार्‍यातून लढण्याची सूचना केली. विशेष म्हणजे शर्मा यांनी होकार दिल्याने पालघर जिल्ह्यातील एका मतदारसंघात तुल्यबळ लढत देणारा उमेदवार मिळाल्याचे शिंदे यांचे मत आहे.

प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपार्‍यातून
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -