मत बाद झाले, तरीही बेस्ट समिती अध्यक्षपदी प्रवीण शिंदे

मत बाद होऊनही प्रवीण शिंदे बेस्ट समिती अध्यक्ष

महापलिकेच्या वैधानि समित्यांच्या निवडणुकीतुन काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याने शिवसेनेचा विजय सुकर झाला. मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत काँग्रेसचे रवी राजा आणि सुधार समितीच्या बैठकीत जावेद जुनेजा यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे बेस्ट समिती अध्यक्षपदी शिवसेना नगरसेवक प्रवीण शिंदे आणि सदा परब यांची बहुमताच्या आधारे निवड झाली आहे. मात्र बेस्ट समितीत सेनेचे उमेदवार प्रवीण शिंदे यांचे मत बाद ठरले.  मात्र, त्यांतरही ते बहुमताच्या जोरावर समिती अध्यक्ष म्हणून निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
सुधार समितीच्या निवडणुकीत सेनेकडून सदा परब, काँग्रेस कडून जावेद जुनेजा आणि भाजपच्या वतीने विनोद मिश्रा हे निवडणूक रिंगणात होते.मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांच्या वेळेत  जुनेजा  यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे सेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या लढतीत सेनेचे सदा परब यांना १३ तर भाजपचे मिश्रा यांना ०९ मते मिळाली. भाजपचे सदस्य रोहन राठोड यांच्या आईचे निधन झाल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे अधिक मते मिळवणाऱ्या सदा परब यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सदा परब सुधार समिती अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
बेस्ट समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने प्रवीण शिंदे, काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपच्या वतीने प्रकाश गंगाधरे निवडणूक रिंगणात होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या १५ मिनिटांच्या वेळेत  रवी राजा यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रवीण शिंदे आणि प्रकाश गंगाधरे यांच्यात झालेल्या लढतीत शिंदे यांना ८ तर गंगाधरे याना ५ मते मिळाली. तर काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र,  २ मते आवाजी मतदान आपल्या उमेदवाराला करून प्रत्यक्ष स्वाक्षरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावापुढे केल्याने अवैध ठरली.  ही मते खुद्द सेनेचे उमेदवार प्रवीण शिंदे आणि भाजपचे  उमेदवार प्रकाश गंगाधरे यांची होती. गंगाधरे यांनी स्वतःला मत देताना सहकारी सदस्य नाना आंबोले यांच्या नावापुढे स्वाक्षरी केली. परंतु यावर काट न मारता त्यांनी पुन्हा  आपल्या नावापुढे स्वाक्षरी केली. त्यामुळे त्यांचे मत अवैध ठरवले. असाच प्रकार  प्रवीण शिंदे यांनी केला. शिंदे यांचे मत बाद ठरले असले तरी त्यांना भाजप पेक्षा अधिक मते मिळाल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट समिती अध्यक्ष  म्हणून प्रवीण शिंदे यांना विजयी घोषित केले.

बेस्ट समितीत दोन्ही उमेद्वारांची मते बाद

बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी धक्कादायक प्रकार घडला. शिवसेनेचे उमदेवार प्रवीण शिंदे आणि भाजपचे उमदेवार प्रकाश गंगाधरे या दोघांची मते अवैध ठरली. दोन्ही उमेदवारांची मते स्वतःला मिळू शकली नाही. आवाजी मतदान उमेदवार म्हणून स्वतःला  केल्यानंतर प्रत्यक्ष स्वाक्षरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावापुढे केल्याने ही मते अवैध ठरली. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे प्रवीण शिंदे विजयी झाले असले तरी आजवरच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची मते अवैध ठरण्याची ही पहिली घटना आहे.
मात्र या प्रकारानंतर भाजप उमेदवार प्रकाश गंगाधरे यांनी आपल्या कडून ही चूक झाल्याचे मान्य करत आपण बेस्ट समिती सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.