सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडेंचा पत्ता कापणार

चुकीच्या निर्णयामुळे शिवसेनेची होते नाचक्की

Mumbai
सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडें

सतत वादग्रस्त ठरणारे महापालिका सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांचा पत्ता कापला जाणार आहे. सुधार समितीच्या बैठकीत चुकीचे निर्णय घेत पक्षाची वारंवार नाचक्की करत असल्याने पुढील वर्षी त्यांना या पदावर संधी न देण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्यामुळे लांडे यांना पहिल्याच वर्षी या समिती अध्यक्षपदाचा गाशा गुंडाळावा लागेल, असे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या एप्रिलमध्ये होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीप लांडे यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. लांडे यांनी पाच नगरसेवकांसह मनसेला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेचे एक गठ्ठा सहा नगरसेवक फुटल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. लांडे यांच्यासह डॉ.अर्चना भालेराव,अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, परमेश्वर कदम, दत्ताराम नरवणकर आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर या गटाचे नेते असल्याने लांडे यांना सुधार समिती अध्यक्षपद बहाल करण्यात आले. दोन वर्षांकरता हे समिती अध्यक्षपद त्यांना देण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते. परंतु पहिल्याच वर्षी लांडे यांनी चुकीचे निर्णय घेत पक्षाला तोंडघशी पाडल्याने पक्षानेही सावध पावित्रा घेतल्याचे समजते.

कुर्ला येथील आरक्षित भूखंडाची खरेदी सूचना महापालिका सभागृहात नामंजूर करायला लावून ही जागा मालकाच्या घशात घालण्याचा डाव उघड झाला. दिलीप लांडे यांच्या सांगण्यानुसारच हा खरेदी सूचनेचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. विरोधकांसह भाजपनेही यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महापालिकेतील नेत्यांना निर्देश देत हा प्रस्ताव पुन्हा सभागृहात आणून मंजूर करायला लावला. त्यानंतर पोयसर येथील आरक्षित भूखंडांचे प्रस्ताव नामंजूर करून एकप्रकारे विकासकाला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. याही प्रकरणात शिवसेनेची नाचक्की झाली. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडा आणि महापालिकेतील भूखंड अदलाबदलीचा चुकीच्या पध्दतीने राखून ठेवला. याबाबत भाजपसह विरोधक आक्रमक झाल्यानंतर तातडीने दुसर्‍यादिवशीच बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर केला.

लांडे यांच्या विरोधातील रान आता अधिकच तापू लागल्याने, खुद्द पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नाराज झाले आहेत. परंतु अध्यक्षपदाचा कालावधी संपण्यापूर्वी राजीनामा द्यायला लावल्यास पक्षाची अधिक बदनामी होईल. त्यामुळे अध्यक्षपदाचा कालावधी संपुष्टात येण्याची वाट शिवसेना पाहत आहे. त्यामुळे सलग दोन वर्ष समिती अध्यक्षपद भुषवण्याचे लांडे यांचे स्वप्न आता धुसर बनवणार आहे. यापूर्वी माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या कालावधीतही पक्षाला नाहक त्रास सहन करावा लागला होता. परंतु त्यांना अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत हटवता येत नसल्याने त्यांचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहण्यात पक्षाने धन्यता मानली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here