घरमुंबईविधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी पंकजा मुंडेंकडून दबावतंत्र?

विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी पंकजा मुंडेंकडून दबावतंत्र?

Subscribe

परळीच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधानपरिषदेत जाण्यासाठीच भाजपवर टीका करत असल्याची जोरदार चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. भाजप नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. भाजप सत्तेत आला असता तर भाजपला विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्य घेण्याची मुभा होती. मग पंकजा मुंडेंसह काही भाजप नेत्यांची विधान परिषदेत वर्णी लागू शकली असती. पण फडणवीस यांच्या आडमुठेपणामुळे भाजप सत्तेपासून लांब झाली आणि विधान परिषदेतील १२ सदस्यही त्यांचे गेले. आता भाजपची नेत्यांची विधान परिषदेतील वर्णी लागणे कठीण झाले आहे.

मात्र भाजपचे नेते यावर उघड बोलायला मागत नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. या पराभवामागे पक्षातीलच काही महत्वाच्या व्यक्ती असल्याचा आक्षेप स्वत: पंकजा यांनी घेतला होता. त्यांच्या या आक्षेपाला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला होता. स्वत: खडसे यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती. खडसे यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली. पण बालेकिल्ल्यातच त्यांचाही पराभव झाला.

- Advertisement -

हे दोन्ही पराभव जाणीवपूर्वक करण्यात आल्याची चर्चा दोन्ही मतदारासंघात होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर आपली व्यथा मांडत बदलत्या संदर्भाचा विचार करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केला. त्याअनुषंगाने पुढचा प्रवास ठरवण्याचा संदेशही त्यांनी दिला होता. पंकजा यांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या या भावनेतून त्यांच्या मनात पक्षविरोधी चलबिचल सुरू झाल्याचे संकेत असल्याचं जाणकार सांगतात. पंकजा यांचा ज्यांनी पराभव केला त्या धनंजय मुंडे यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळकी लपलेली नाही. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या मोहिमेतूनही ही जवळकी स्पष्ट झाली होती. मुख्यमंत्री पदाच्या पक्षांतर्गत अडसरांमध्ये ज्या काहींची नावे घेतली जातात त्यात पंकजा मुंडे यांचे नाव सर्वात वरचे होते. अशावेळी पंकजा यांचा झालेला पराभव खूप काही सांगून जात असल्याचे त्यांचे कार्यकर्ते उघडपणे सांगतात. तसे फडणवीस यांना अडसर ठरलेल्या एकूण एकांना त्यांनी पध्दतशीरपणे दूर केले.

अडचण होती ती पंकजा यांची. यातूनच लढतीत त्यांचा पराभव झाला, अशी चर्चा पक्षातही होती. हा पराभव पंकजा यांना चांगलाच लागला. यामुळे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतूनही त्या बाहेर गेल्या. आता पुन्हा राजकारणात सक्रीय व्हायचे असल्यास पुन्हा विधानमंडळात जाण्याशिवाय पर्याय नाही, हे पंकजा यांना पुरते ठावूक आहे. अशावेळी त्यांच्यापुढे विधानपरिषद हा एकमेव मार्ग आहे. या मार्गापर्यंत पोहोचायचे असल्यास दबावतंत्राचा वापर केल्याविना पर्याय नाही, हे पंकजा जाणून आहेत. यासाठी त्या दबावतंत्राचा वापर करता आहेत. याचाच भाग म्हणजे फेसबुकवरील त्यांची पोस्ट असल्याचं सांगतात. येत्या १२ तारखेला त्या गोपीनाथ गडावर गर्दी जमवणार आहेत. या गर्दीतूनही त्यांना पक्ष नेत्यांना इशारा द्यायचा असावा, असे एका नेत्याने या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केलं.

- Advertisement -

रोहिणी, पंकजाला पक्षातील विरोधकांनी पाडले -खडसेे

पक्षांतर्गत कुरघोड्या करतानाच पक्षाच्या उमेदवारांविरूद्ध कारवाया करून उमेदवारांना पाडण्याचे उद्योग झाले. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनाही अशाच रितीने पाडण्यात आले. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचाही असाच आरोप आहे. हे उद्योग करणार्‍यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पुराव्यासह देऊन कारवाईची मागणी केलेली आहे. त्यावर कारवाईची प्रतीक्षा आहे, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला नसून पक्षांतर्गतच कटकारस्थान करुन त्यांना पाडण्यात आले. त्यांच्या विरोधातील उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत पुरविली गेली, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -