अवघ्या नऊ दिवसांत डेंग्यू आणि मलेरियाचे १ हजार ४७९ अड्डे नष्ट

करेानात सॅनिटायझेशनचे महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या किटक नाशक विभागाच्या कामगारांची कामगिरी

Mumbai

करोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणार्‍या उपाययोजनांमधील सॅनिटायझेनशनमध्ये सहभागी असलेल्या किटक नाशक विभागाने आता करोनासोबतच पावसाळ्यातील साथीच्या आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कंबर कसली आहे. करोनाच्या बाधित रुग्णांमुळे इमारत, परिसर, शौचालय तसेच इतर वास्तूंचे निर्जंतुकीकरणाचे काम फत्ते करतानाच या विभागाने मागील १३ मेपासून पूर्णपणे डेंग्यू आणि मलेरियाला आळा घालण्यासाठी तसेच त्यांच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मोहिम हाती घेत अवघ्या ९ दिवसांमध्ये १ हजार ४७९ ठिकाणी एडीस एजिप्ति व अ‍ॅनॉफिलीस स्टिफेन्सी या डासांच्या अळ्यांचे अड्डे नष्ट केले आहेत.

डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्यादृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात ही तपासणी मोहीम केली जाते. या मोहिमेदरम्यान किटकनाशक खात्यातील बहुतांश सर्व कामगार – कर्मचारी – अधिकारी सहभागी होऊन तपासणीचे लक्ष्य निश्चित करून तपासणी करतात. करोनामुळे यंदा पावसाळापूर्व करण्यात येणारी मोहीम स्वरूपातील तपासणी १३ मे २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान दिनांक १३ ते २१ मे २०२० या केवळ नऊ दिवसांच्या कालावधीत तब्बल १ हजार १४६ ठिकाणी ‘एडिस एजिप्ती’ या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणार्‍या डासांच्या अळ्या आढळल्या. तर ३३३ ठिकाणी मलेरिया वाहक ‘अ‍ॅनॅफिलीस स्टिफेन्सी’ डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. तपासणी मोहिमेदरम्यान आढळून आलेली डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे किटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्यातील १ हजार ५०० कामगार – कर्मचारी – अधिकारी हे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही अव्याहतपणे कार्यरत असून त्यांनी यावर्षीच्या पावसाळा पूर्व तपासणी मोहिमेदरम्यान मुंबईच्या कानाकोपर्‍यातील विविध भागांचे व इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण केले आहे. या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्री मध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभीवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणार्‍या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या मधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here