घरमुंबईनामांकितऐवजी घराजवळील कॉलेजला प्राधान्य द्या

नामांकितऐवजी घराजवळील कॉलेजला प्राधान्य द्या

Subscribe

दहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा सर्वसाधारणपणे चांगला कॉलेज निवडण्याकडे कल असतो. कारण चांगले कॉलेज मिळाल्यास चांगले गुण मिळण्यास मदत होते व बारावीनंतर आपल्याला हव्या त्या अभ्यासक्रमाला जाता येते. असा समज आहे. परंतु चांगले कॉलेज निवडण्याऐवजी घराजवळील कॉलेज निवडा व वाचणारा वेळ अधिकाधिक अभ्यासासाठी द्या, असा सल्ला रुपारेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. तुषार देसाई यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

विद्यार्थ्यांनी विषय निवडताना कोणत्या बाबींचा विचार करावा
डॉ. देसाई – आपल्याला कोणत्या प्रकारचा जॉब करायचा आहे. आपले ध्येय काय आहे याचा मुलांनी आधी विचार करणे गरजेचे आहे. एकदा विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित झाले की त्यांना आर्ट्स, सायन्स व कॉमर्स किंवा अन्य विषय निवडण्यास सोपे जाते.मला कोणतरी सांगतो, माझ्या मित्राने हा कोर्स केला म्हणून मी करतो असे करू नये.मला कोणतरी सांगतो, माझ्या मित्राने हा कोर्स केला म्हणून मी करतो असे करू नये. अभ्यासक्रमाची सर्व माहिती घेऊन त्याच्याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करून तो विषय निवडावा. आता भरपूर कॉलेज आणि कोर्सेस उपलब्ध आहेत. बारावीपर्यंत त्यावर फोकस करावे त्यानंतर त्यांना थोडीशी कल्पना येते त्यानंतर कशामध्ये करियर करायचे आहे हे स्पष्ट होते. चांगले साध्य मिळवायचे असेल तर गोल ठरवणे महत्त्वाचे आहे. आवडीनुसार विषय निवडणे गरजेचे आहे.

- Advertisement -

कॉलेज निवडण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या बाबींचा विचार करावा
डॉ. देसाई – आपल्याला बारावीला चांगले गुण हवे असतील तर चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळणे महत्त्वाचे असते. असा विद्यार्थी व पालकांचा समज आहे. परंतु कोणतेही कॉलेज चांगले किंवा वाईट नसते. सर्व कॉलेजकडून उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. चांगले कॉलेज असले आणि विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही तर त्याला गुण मिळणारच नाहीत. बारावीला चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घराजवळील कॉलेज निवडावे. जेणेकरून प्रवासामध्ये फार वेळ जाणार नाही. कॉलेज घराजवळ असल्यास अभ्यासाबरोबर अन्य अ‍ॅक्टिव्हिटी करण्यासही पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येते.

एंटरन्स एक्झामची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल
डॉ. देसाई – आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा एंटरन्स देण्याकडे अधिक कल असतो. त्यामुळे त्यांनी आधीपासूनच नियोजन करावे. आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षात त्यावर लक्ष केंद्रीत करावे. कारण त्यांना सायन्सच्या मुलांप्रमाणे प्रक्टिकल्स व जर्नल नसतात व त्यांच्या कॉलेजची वेळ ही सकाळी किंवा दुपारची असते. त्यामुळे त्यांच्याकडे अभ्यासाला व आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी फार वेळ असतो. तो वेळ वाया न घालवता एंटरन्ससाठी आवश्यक असणार्‍या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. या वेळेत इंटरन्ससाठी काय आवश्यक आहे, काय अभ्यास करावा लागेल याची माहिती घ्यावी.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे ध्येय निश्चित करावे
डॉ. देसाई – सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम आपला बायोडेटा लिहावा. सुरुवातीला त्यामध्ये दहावी व बारावीचेच गुण असतील. पण दरवर्षी आपले स्किल वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून आपला बायोडाटा अधिक मजबूत होण्यास मदत होईल. बायोडाटा मजबूत करताना आपल्याला नेमके काय करायचे आहे याचा अंदाज येतो. त्यानुसार आपण दरवर्षी आपल्या ध्येयाच्या दृष्टीने कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. ध्येय निश्चित झाले की त्याप्रमाणे विषय निवडून आपण ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो आणि जे आपल्याला आवडते तेच करियर असते.

कॉलेज एन्जॉय करायचे असा विद्यार्थ्यांचा समज असतो त्याबद्दल काय सांगाल
डॉ. देसाई – कॉलेज लाईफ एन्जॉय करायचे असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. पण कॉलेजच्या आयुष्यात भरपूर अभ्यास करून चांगले गुण मिळवले तर पुढील आयुष्यात त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळते व संपूर्ण आयुष्य एन्जॉय करता येते. पण काही विद्यार्थ्यांच्या घरचा व्यवसाय असतात. ती मुले एन्जॉय करतात त्यांच्यामागोमाग अन्य विद्यार्थीही जातात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. कॉलेजमध्ये विद्यार्थी ग्रुप करतात. पण या ग्रुपमध्ये त्यांनी अभ्यासाच्या किंवा करियरच्या चांगल्या चर्चा कराव्यात. अन्यथा मित्रांच्या सहवासाने त्यांना वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

प्रवेशासंदर्भात पालकांना काय सल्ला द्याल
डॉॅ. देसाई – पालकांकडून मुलांवर स्वप्ने मुलांवर लादत असतात. मी अमुक कोर्स करू शकलो नाही तो माझ्या मुलांनी करावी अशी इच्छा पालकांची असते. काही मुले पालकांनी सांगितले म्हणून अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. पण मग झेपत नसल्याने गैरमार्गाला लागतात. ते कॉपीकडे वळतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम निवडीसाठी दबाव आणू नये. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य द्यावे.

अभ्यासक्रमाबाबत गोंधळलेल्या मुलांनी प्रवेश कसा घ्यावा?
डॉ. देसाई – ज्या विद्यार्थ्यांच्या घरी कोणी शिकलेले नसते त्यांना काऊन्सिलिंगची गरज असते. त्यासाठी त्यांनी शाळेतील किंवा कॉलेजमधील शिक्षकांकडून काऊन्सिलिंग करून घ्यावे. कॉलेजमधील शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडण्यासाठी कट ऑफच्या साहाय्याने मदत करतात. कोणता विषय घेतल्याने कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो यासाठीचे चांगले मार्गदर्शन कॉलेजमधील शिक्षकांकडून मिळते. कॉमर्स, आर्ट्स व सायन्समध्ये कोणते पर्याय आहेत. त्याव्यतिरिक्त कोणते अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास कोणत्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात अशी सर्व माहिती शिक्षक किंवा काऊन्सिलरकडून मिळते.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -