घरमुंबईबीडीडीसाठी मुख्यमंत्री-विखे सक्रिय शिवसेनेच्या नेत्यांना धक्का!

बीडीडीसाठी मुख्यमंत्री-विखे सक्रिय शिवसेनेच्या नेत्यांना धक्का!

Subscribe

 वरळी आणि परिसरातील बीडीडी चाळींच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळ निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आणि त्यासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दाखवलेली तत्परता यामुळे मित्रपक्ष शिवसेनेसह भाजपातील नेतेही आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या मंडळात शिवसेनेच्या एकाही मंत्र्याला किंवा आमदाराचा समावेश करण्यात आलेला नसल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.

बीडीडी चाळींचा समावेश असलेल्या मतदार संघातील सुनील शिंदे, अजय चौधरी यांच्यासारख्या शिवसेना आमदारांचा मंडळात समावेश तर नाहीच, पण गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनाही या मंडळात स्थान देण्यात आलेले नाही. परिणामी वरळी, शिवडी, नायगांव या शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यात फडणवीसांनी शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला आहे.

- Advertisement -

नव्यानेच भाजपचे कमळ हाती घेणार्‍या कालिदास कोळंबकरांनाही मंडळात स्थान मिळालेले नाही. सात वेळा आमदार होऊनही नायगाव परिसरातील चाळकर्‍यांच्या प्रश्नात एकेकाळच्या राणे समर्थक कोळंबकरांना अपयश आले. त्यातच काँग्रेसची सद्यास्थिती पाहता आता चाळींच्या विकासाचा हा विषय अशक्यतेतच जमा झाला होता. त्यामुळेच कोळंबकर प्रसाद लाडांकरवी मोर्चेबांधणी करुन भाजपात शिरलेत. पण त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी अर्धचंद्र दिला आहे.

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत आल्याच्या धक्क्यातून वरळी-शिवडी परिसरातील तळाचा कार्यकर्ता आणि शिवसैनिक अजून सावरलेला नाही. राष्ट्रवादीची मुंबई गडाची जबाबदारी असणार्‍या सचिन अहिर यांचे भाजपत प्रवेश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्या आधी राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या आणि मुख्यमंत्र्यांची विशेष मर्जी संपादन केलेल्या प्रसाद लाड यांनीच अहिर यांचा भाजप प्रवेश हाणून पाडला होता. लाड यांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून अहिर फडणवीसांच्या मर्जीत बसणार नाहीत आणि त्यांना भाजपत शिरता येणार नाही, याची काळजी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अहिरांनी लाडांच्या केलेल्या खच्चीकरणाचा आता वचपा काढलाआहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

- Advertisement -

वरळीतील जमिनीला असलेला सोन्याचा भाव आणि राजकीय निष्प्रभता आलेल्या सचिन अहिर यांच्यासारख्या बिल्डरांमध्ये विशेष उठबस असलेल्या नेत्याला मिळालेली शिवसेना प्रवेशाची संजीवनी यामुळे भाजपतील बड्या असामी गडबडून गेले आहेत. मात्र फडणवीसांच्या खेळीने सेना, राष्ट्रवादी, भाजप आणि बडे बिल्डर सगळ्यांनाच ’जोर का झटका धीरे सा’ लागला आहे.

स्वतंत्र मंडळनिर्मिती मंत्रालयीन बाबूंच्या कचाट्यात सापडू नये, म्हणून पाठपुरावा करण्यात ’व्यावसायिक’ आमदार प्रसाद लाड वर्षा ते मंत्रालय विशेष धावपळ करत होते. हे करत असताना त्यांनी वरळी, नायगावच्या चाळकर्‍यांना झटपट घर देऊन शिवसेनेच्या मतदारांवर मोहिनी घालण्यापेक्षा ’मातोश्री’ आग्रहाने सचिन आहिर या मंडळात शिरणार नाही, याची खबरदारी घ्यायची होती आणि त्यात ते यशस्वी ठरल्याचे बोलले जाते.

मंगळवारी कॅबिनेट बैठकीनंतर गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील यांनी मंत्रालयात हजर नसतानाही या मंडळाच्या फाईल प्रवासासाठी एका विश्वासू अधिकार्‍यावर जबाबदारी सोपवली होती. या नव्या मंडळाच्या निर्मिती आणि घोषणेबद्दल ‘मातोश्री’अंधारात असल्याचे एका ज्येष्ठ सेना नेत्याने महानगरला सांगितले.

 ’महानगर’च्या बातमीची चर्चा
वरळीसह बीडीडी चाळींच्या परिसरात फेरफटका मारला असता नाक्यानाक्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणेची चर्चा चवीचवीने सुरु होती. बीडीडी चाळींच्या स्वतंत्र मंडळाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्कारासाठी शक्तीप्रदर्शन करण्याकरता भाजपने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे त्याची जबाबदारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि नामांकित बिल्डर मंगल प्रभात लोढा यांच्यावर सोपवली असल्याचे सांगितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -