मद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे प्राध्यापकाला पडले महागात

मद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे एका प्राध्यापकाला महागात पडले आहे. चोरट्यांनी प्राध्यापकाला २३ हजार ६८० रुपयांचा गंडा लावला आहे.

Mumbai
मद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे प्राध्यापकाला पडले महागात

मद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे माटुंगा येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन मद्याची ऑर्डर देण्यासाठी गुगलवर शोधण्यात आलेल्या क्रमांकावरून या प्राध्यापकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

बोरिवलीत राहणारे प्राध्यापक हे माटूंगा येथील एका नामांकित महाविद्यालयात जीवरसायनशास्त्र हा विषय शिकवतात. महाविद्यालयातील एका शिपायाला प्राध्यापकांनी स्वतःचे क्रेडिड कार्ड देऊन एक ‘पोर्टवाईन’ ऑर्डर करण्यास सांगितली. दरम्यान, शिपायाने गुगलवर नजीक असलेल्या वाईन्स शॉपचा शोध घेतला असता ‘बाबा वाईन्स शॉप’ चा फोटोवर मोबाईल क्रमांक मिळून आला. शिपायाने त्या क्रमांकावर फोन करून चौकशी केली असता वाईन्स शॉप मधून बोलत असल्याचे पलीकडच्या व्यक्तीने सांगितले. या शिपायाने पोर्ट वाईन्स ची किंमत विचारली असता ४२० रुपये सांगण्यात आली. शिपायाने ऑनलाईन ऑर्डर केली असता त्याने क्रेडिड कार्डची माहिती विचारून ओटीपी नंबर मागितला.

२३ हजार ६८० रुपयांचा गंडा

प्राध्यापकांनी त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर दिला असता त्यांच्या खात्यातून २३ हजार ६८० रुपये गेल्याचा मेसेज प्राध्यापकांना आला. त्यांनी ताबडतोब बँकेला फोन करून पुढील व्यवहार थांबऊन बाबा वाइन्स शॉपचा शोध घेतला. मात्र असे वाईन्स शॉप परिसरात नसल्याचे समजताच आपली फसवणूक झाली असे प्राध्यापकाला कळाले. यानंतर प्राध्यपकाने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माटुंगा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली.