नाट्यगृह उभारण्याचे नाटक

पाच वर्षांनंतरही ऐरोली नाट्यगृह खड्ड्यातच

Mumbai

ऐरोली सेक्टर-४ येथील नाट्यगृहासाठी प्रस्तावित जागेत योग्य वेळेत बांधकाम केले नसल्याने आता त्या जागेवर तळे तयार झाले आहे.या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती निर्माण झाली आहे .गेल्या कित्येक वर्षांपासून हे तळे असेच पडून आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नाट्यगृहाच्या स्वप्नांवर पुरते पाणी फिरले आहे.

नवी मुंबई महापालिकेचे वाशीत एकमेव असे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे.या नाट्यगृहाबरोबरच ऐरोली परिसरातही एक नाट्यगृह असावे, यासाठी पालिकेने पाच वर्षांपूर्वी अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. ऐरोलीच्या मध्यभागी सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर २८९३.२९ क्षेत्रफळावर हे नाट्यगृह उभारले जात आहे. २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या उभारणीला मे. महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने सुरुवात केली. कामाची सुरूवात झाली असता बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खड्डा खोदून ठेवण्यात आला.मात्र त्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत कंत्राटदाराने पुढे या नाट्यगृहाचे काम केलेच नाही.पालिकेने सहा वेळा ऐरोली नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या. मात्र त्यांना कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पाच वर्षे हे काम रखडलेले आहे.या खड्ड्यात एका वर्षापूर्वी एका महिलेने ४ वर्षांच्या आपल्या मुला सहित आत्महत्या केली होती. यावरून नाट्यगृहाच्या जागेवर असलेल्या खड्डयांची खोली लक्षात येते. नंतर त्याठिकाणी चारही बाजूने ठिकठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत.

काही नागरिक त्या पत्रांच्या मोकळ्या जागेतून या तळ्याच्या काठावर जाऊन बसतात.काही महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेमध्ये या नाट्यगृहाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला महासभेमध्ये मान्यता मिळाली असून नव्याने नाट्यगृह उभारणीच्या कामाला सुरु करण्यात येईल असे सांगितले गेले होते.तरीही सुरूवात झाली नाही. साडेचार वर्षांपूर्वी विधासभेचे बिगुल वाजण्याच्या अगोदर घाईघाईने व कोणताही नियोजन न करता पायाभरणी समारंभ उरकण्यात आला होता.परंतु, या ना त्या कारणाने नाट्यगृहाचे बांधण्याचे काम रखडत चालले आहे.

कामाच्या खर्चात वाढ

या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पूर्वी ९९ कोटी ३५ लाख ९२ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव होता. त्यात आता जीएसटीच्या २ कोटी ५८ लाख ६ हजार रुपयांची भर पडली.पाच वर्षांपूर्वी या कामासाठी लागणारा खर्च हा ६६ कोटी ३५ लाख ९२ हजार रुपये होता. आता त्यामध्ये जीएसटीपोटी २ कोटी ५८ लाख ६ हजार रुपये खर्चाची वाढ होत. हा खर्च ६८ कोटी ९३ लाख ९८ हजार रुपये इतका झाला आहे.

यासाठी नव्याने निविदा मागवण्याचे काम सुरू आहे.त्यानंतर लवकरच काम सुरू करण्यात येईल.                            गिरीश गुमास्ते,कार्यकारी अभियंता,ऐरोली विभाग कार्यालय