सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे धारावीत तीनतेरा

प्रशासनासह पोलिसांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर

Mumbai

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात जेव्हा करोनाचा कहर सुरू झाला होता. तेव्हा धारावीत अशी परिस्थिती झाली तर काय होईल याची केवळ कल्पना करणार्‍यांना सध्या धारावीतील रुग्णांची आकडेवारी थक्क करायला लावत आहे. दिवसेंदिवस धारावीतील बाधित रुग्णांचा आकडा शेअर बाजाराप्रमाणे वाढतो आणि कमी होताना दिसत आहे. परंतु, धारावीतील आजची परिस्थिती खूपच भयानक असून सुरुवातीला योग्यप्रकारे करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींकडे लक्ष देणारे प्रशासनातील अधिकारी आता दुर्लक्ष करताना दिसत आहे. तसेच शौचालयांच्या स्वच्छतेसह सोशल डिस्टन्सिंगच्या प्रमुख समस्येमुळे धारावीकरांना करोनाने जखडून ठेवले आहे. त्यामुळे प्रशासनाने केंद्रीय पथकाच्या शिफारशीचे तंतोतंत पालन केल्यास तसेच जादा पोलीस यंत्रणा तैनात करत सोशल डिस्टन्सिंगवर मात केल्यास वरळीप्रमाणे धारावीतूनही करोनाला काढता पाय घ्यावा लागेल,असे बोलले जात आहे.

धारावीत आतापर्यंत कारोनाचे एकूण १४७८ बाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील साडेपाचशेच्या जवळपास रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मुंबईतील सर्वांत पहिले क्वारंटाईन सेंटर हे धारावीत उभारले गेले असले तरी सुरुवातीला महापालिका प्रशासनाकडून जेवढ्या तत्परतेने बाधित रुग्ण आणि त्यांच्या अतिनिकटच्या व्यक्तींना क्वांरटाईनमध्ये नेले जायचे तशाप्रकारे आता प्रशासनातील अधिकारी गंभीरतेने लक्ष देत नसल्याची खंत लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार एकट्या धारावीत ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सर्व्हे करण्यात आला. यामध्ये १ लाख २१ हजार ५८१ लोकांची नोंद करून त्यांच्या आरोग्याची माहिती संकलित करण्यात आली. मुळात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे आता सर्वांत महत्त्वाचे आहे. आकडेवारी पाहता, धारावीतील या ज्येष्ठांच्या जीवितालाही तेवढाच धोका निर्माण झाला आहे. परिणामी धारावीत आणखी हे प्रमाण वाढल्यास या ज्येष्ठांचा विचार करता धारावी ही मुंबईतील करोनाचा मोठा हॉटस्पॉट तयार होईल. याची शक्यता नाकारता येत नाही, असेही लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

धारावीची संपूर्ण वस्ती ही दाटीवाटीची असून प्रत्येक घरावर दोन ते तीन मजले चढवले गेले आहेत. त्यामुळे छोट्याशा घरात तीन ते पाच कुटुंबे राहत असतात. परंतु, प्रत्येक वस्तींमध्ये सार्वजनिक शौचालये ही करोनाची प्रमुख केंद्रे बनली आहेत. प्रशासन या शौचालयांची योग्यप्रकारे स्वच्छता राखून निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात काही शौचालयांचे निर्जंतुकीकरण होतच नाही, तर काही शौचालयांचे दिवसांतून दोन वेळा निर्जंतुकीकरण केले जात आहे. परंतु, शौचालयांचा वापर आणि त्यातील गर्दी पाहता हे निर्जंतुकीकरण निरुपयोगी ठरत आहे.

त्याचमुळे अधिक लोकांना बाधा झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तसेच संपूर्ण धारावीत सोशल डिस्टन्सिंग हीच प्रमुख समस्या असून खरेदीसाठी होणारी गर्दी आणि रस्त्यांवर रात्रीच्यावेळी जमणारे नागरिक आदींना नियंत्रणात न आणल्यास धारावीतील बाधितांचे प्रमाण अधिकच वाढेल, अशीही चिंता सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे खुद्द महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे धारावीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. शिवाय जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी आपले लक्ष धारावीकडे केंद्रीत केले आहे. परंतु, दाटीवाटीने वसलेल्या या वस्तीतील लोकसहभागाशिवाय प्रशासनाला यात यश येणार नाही. याची पूर्ण कल्पना आता त्यांना आलेली असल्याने त्यांनी जनतेची मदत घेऊनच आता विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.

माटुंगा लेबर कॅम्पसह आझाद नगर परिसरात सर्वांधिक जास्त रुग्ण आहेत. या विभागात महापालिका रुग्णालयांसह लिलावती, हिंदुजा रुग्णालयातील कामगार व कर्मचारी आहेत यात सफाई कामगारही आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील हे कामगार जास्त बाधित असून शाहुनगरकडे जाणार्‍या वाल्मिकी रोडवर ज्याप्रमाणे गर्दी उसळते, त्याबाबत तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. तसेच नागरिकही कोणतीही काळजी घेत नाहीत. – हर्षला मोरे, प्रभाग क्रमांक १८९, शिवसेना नगरसेविका

मुळात धारावीत सुरुवातीला खासगी डॉक्टरांच्या मदतीने जी सुमारे ४८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८५० संशयित रुग्ण बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे धारावीतील रुग्णांची संख्या वाढलेली आहे. माझ्या विभागातील म्हणाल तर मुकुंद नगर, शिवशक्ती नगर, हनुमान चौक, संत ककय्या रोड येथे रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासन योग्यप्रकारे काम करत आहे. मी माझ्या विभागात आतापर्यंत १० हजार जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वितरण केले आहे. अजून २ हजार पाकिटांचे वाटप करणे बाकी आहे, तर विभागातील सार्वजनिक शौचालयांची निर्जंतुकीकरण दिवसांतून दोन वेळा केली जात आहे. आतापर्यंत माझ्या प्रभागात १६७ बाधित रुग्ण आले असून त्यातील ४३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. -वसंत नकाशे, प्रभाग क्रमांक१८६, जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष

माझ्या प्रभागात मुकुंदनगर, ट्रान्झिट कॅम्प, सोशल नगर हे करोनाचे मुख्य हॉटस्पॉट आहेत. संपूर्ण प्रभागात शंभरच्या लगबग रुग्ण असतील. परंतु, सुरुवातील जी काळजी प्रशासनाकडून घेतली जात होती ती काळजी आता प्रशासनाकडून घेतली जात नाही. सार्वजनिक शौचालय हीच प्रमुख समस्या असून यांचे योग्यप्रकारे सॅनिटायझेशन केलेच जात नाही. शिवाय लोकांची सोशल डिस्टिन्सिंग हीसुध्दा मोठी समस्या आहे.– बब्बू खान, प्रभाग क्रमांक १८४, काँग्रेस नगरसेवक

माझ्या प्रभागात आतापर्यंत बरेच रुग्ण आढळून आले आहेत. कुंचिकुरवे नगर, चमडानगर, इंदिरा नगर, अण्णा नगर, एडीजी नगर, प्रभाकर कुंटे नगर आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले असून शौचालयांचे सॅनिटायझेशन होत असले तरी लोकांची गर्दी पाहता हा प्रयत्न तोकडा दिसत आहे. महापालिका केवळ १ हजार जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे देत आहेत. एवढ्या मोठ्या वस्तीला एक हजार पाकिटे कशी पुरणार? एवढ्या छोट्या घरात लोक राहत आहेत, उद्योग व्यवसाय चालत आहे. मग ते एवढ्या छोट्या जागेत दिवसभर राहणार कसे? ते बाहेर पडताच आणि सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होतो. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार केला तर दहा बाय दहाच्या खोलीतून तुम्ही बाहेर न पडता घरातच राहा म्हणून किती दिवस आवाहन करणार ? – खान रेशमाबानो मोहम्मद हाशिम, प्रभाग क्रमांक १८८, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका

*आतापर्यंत झालेल्या बाधितांची संख्या : १४७८

*आतापर्यंत बरे होऊन परतलेले : ५२५

*आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या : ५७

*महापालिकेच्यावतीने केलेला वरिष्ठ नागरिकांचा सर्व्हे : १२१५८१

*आतापर्यंत केलेल्या लोकांची तपासणी .: ३ लाख ६० हजार

*९ दवाखान्यांमध्ये आतापर्यत केलेली तपासणी : ११ हजार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here