घरCORONA UPDATEक्वारंटाईन खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बील वसुली सुरूच!  

क्वारंटाईन खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बील वसुली सुरूच!  

Subscribe

ठाण्यातील रूग्णालयांकडून अजूनही मोफत उपचार केला जात नसून रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील वसुली केली जात आहे. एका रुग्णालयाने अवघ्या अडीच दिवसांचे २४ हजार रुपये आकारल्याचा प्रकार घडला आहे.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, ठाण्यातील रूग्णालयांकडून अजूनही मोफत उपचार केला जात नसून रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील वसुली केली जात आहे. एका रुग्णालयाने अवघ्या अडीच दिवसांचे २४ हजार रुपये आकारल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे  मोफत उपचाराची पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांची घोषणा महापालिकेतच ‘क्वारंटाईन’ राहिली आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

शहरातील होरायझन प्राईम, सफायर, कौशल्या आणि वेदांत रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी केली होती. त्याची प्रसिद्धीही करण्यात आली. मात्र, अंमलबजावणीच्या पातळीवर ठणाणा आहे. संबंधित रुग्णालये मोफत उपचार करतात की पठाणी वसुली करतात, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पालकमंत्री व महापौरांनीही त्यावर नजर ठेवलेली नाही. रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा वसुली सुरूच आहे, असा आरोप नगरसेवक पवार यांनी केला आहे. पाचपाखाडीतील एका रुग्णालयाने अवघ्या अडीच दिवसांत कोरोनाच्या रुग्णाला डिस्चार्ज देऊन, भाईंदरपाडा येथील केंद्रात क्वारंटाईन राहण्यास सांगितले. या रुग्ण महिलेकडून २४ हजार रुपये वसूल करण्यात आले, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

तसेच ठाणे शहरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सुविधांचा बोजवारा उडत असल्याचे अनेक वेळा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत क्वारंटाईन सेंटरमधून अनुक्रमे ६०, २३ आणि १०० रुग्ण मिळाले. क्वारंटाईन केल्यामुळे कोरोनाचा प्रसार टाळल्याचे म्हणत प्रशासन पाठ थोपवून घेत आहे. मात्र, या केंद्रातून मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने तेथून कोरोनाचा प्रसार होत असल्याची भीती आहे. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर कोरोनाची निर्मिती केंद्रे होऊ नयेत, अशी भीती ही पवार यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -