राहुल गांधी यांची मुंबईकरांना भावनिक साद

Mumbai
आगामी सभेसाठी मुंबई काँग्रेसने रणशिंग फुंकले

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ काँग्रेस महाराष्ट्रातून फोडणार आहे. त्याअनुषंगाने येत्या १ मार्च रोजी मुंबईत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होणार असून, या सभेसाठी राहुल यांनी मुंबईकर जनतेला भावनिक साद देत सभेचे निमंत्रण दिल्याचे चित्र मुंबईभर दिसून आले आहे. सध्या मुंबईतील रस्त्यांवर या १ मार्चच्या सभेसाठी पोस्टर लावण्यात आले असून, प्रिय मुंबईकर, मी येतोय…अशी भावनिक साद घालणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, शिवसेना भवनासमोरदेखील अशाप्रकारचे पोस्टर लावून विरोधकांनी एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, १ मार्च रोजी होणारी ही सभा एमएमआरडीएच्या ग्राऊंडवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आघाडीसाठी बोलणी सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रचाराचा नारळ महाराष्ट्रातून फोडणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीदेखील सभा मुंबईत आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळविला आहे. लोकसभेसाठी राज्यात एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील नेत्यांमधील वाद संपुष्टात आणून निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याच्या दृष्टीने राहुल गांधी येत्या 1 मार्च रोजी महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहेत.

राहुल गांधी यांची येत्या 1 मार्च रोजी मुंबई आणि धुळ्यात सभा होणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सभा घेतली होती. आता राहुल गांधीदेखील धुळ्यातून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. धुळ्यासोबत राहुल गांधी मुंबईत सभा घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई काँग्रेसकडून ‘प्रिय मुंबईकर, मी येतोय… आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण अवश्य या…’ अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी थेट मतदारांना संवादासाठी बोलावले आहे, तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लढली जाणारी लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाय, धुळ्यातील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी काय बोलतात याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा केली आहे. भाजपविरोधात सध्या दोन्ही विरोधक एकत्र येताना दिसत आहेत.

दरम्यान, या सभेसाठी मुंबई काँग्रेसनेदेखील रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडे या सभेची सर्व जबाबदारी देण्यात आली असून, या सभेसाठी एमएमआरडीए ग्राऊंड निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता असून, यासाठी नुकतीच मुंबई काँग्रेसची एक बैठक पार पडली असून, यात सर्व विभागीय नेत्यांसह आमदार भाई जगताप, अभिनेत्री नगमा आणि युवक काँग्रेसचे सूरज सिंग यांच्यासह अनेक मान्यवर हजर राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here