घरमुंबईरेल्वे प्रवासी घेऊ शकणार मोकळा श्वास...

रेल्वे प्रवासी घेऊ शकणार मोकळा श्वास…

Subscribe

रेल्वे प्रवाशांच्या मोबाईल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सराईत महिलेसह चौघांना चोरीच्या दहा मोबाईलसह अटक.

रेल्वे प्रवाशांच्या मोबाईल चोरी करणार्‍या एका टोळीचा वांद्रे रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका सराईत महिलेसह तिच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. मुस्कान मेहबूब शेख, सुफियान मुदलीयार दळवी, आसिफ नूरनबी खान आणि तन्वीर मेहमूद शेख अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयीन कोठडी पाठविले आहे. या चौघांकडून पोलिसांनी एक लाख रुपये किंमतीचे दहा चोरीचे मोबाईल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिलकुमार जाधव यांनी सांगितले.

विशेष मोहीमेअंतर्गत केली कारवाई

ऑगस्ट महिन्यांत विरार लोकलच्या महिलांच्या राखीव डब्ब्यात चढताना एका महिलेचा सुमारे सतरा हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात महिलेने चोरी केला होता. याप्रकरणी या महिलेने वांद्रे रेल्वे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना संबंधित आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिलकुमार जाधव यांच्या पथकातील पी. एन भोसले, के. एस. लोंढे, व्ही. एस. बंडकर, गुरव, चव्हाण, कुंटे, राठोड, इंगळे, कुंभार, पिंगळे, महाडेश्वर, वर्णेकर, खटके यांनी संबंधित महिला आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मुस्कान शेख या तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

- Advertisement -

सराईत महिलेलाही अटक

चौकशीत मुस्कान ही मोाबईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. तिने तक्रारदार महिलेचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याविरुद्ध अशाच मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहे. गर्दीचा फायदा घेऊन ती महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी करीत होती. चोरीचे मोबाईल विक्रीसाठी ती इतर तीन आरोपींची मदत घेत होती. कमी किंमतीत ते तिघेही चोरीचे मोबाईल विक्री करुन तिला पैसे देत होते. तिच्या चौकशीनंतर इतर तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे दहा चोरीचे मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. पोलीस कोठडीनंतर या चौघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. या चौघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -