घरमुंबईविद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे कर्मचार्‍यांचा रेलरोको

विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे कर्मचार्‍यांचा रेलरोको

Subscribe

स्पेशल गाडीत जागा नसल्याने रेल्वे कर्मचारी संतापले

मध्य रेल्वेने रेल्वे कर्मचार्‍यांना कामावर पोहोचण्यासाठी शटल सेवा सुरू केली आहे. मात्र रेल्वेकडून चालविण्यात येणार्‍या शटल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत असल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र तरीसुद्धा रेल्वेकडून दखल न घेतल्यामुळे संतापलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांनी सोमवारी 5.30 वाजता विद्याविहार रेल्वे स्थानकात रेलरोको केला. त्यानंतर तब्बल एक तासाने रेल्वे कर्मचार्‍यांची स्पेशल ट्रेन कर्जतसाठी रवाना झाली.

मध्य रेल्वेचे परळ आणि माटुंगा हे दोन वर्कशॉप उघडण्यात आले आहेत. येथे काम करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना रोज कामावर यावे लागते. त्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी मध्य रेल्वेने शटल सेवा सुरू केली आहे. मात्र कर्मचारी जास्त आणि शटल कमी, अशी परिस्थिती असल्यामुळे शटल ट्रेनमधून प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येत नाही. कर्मचार्‍यांनी वारंवार जास्त शटल ट्रेन सोडण्याची रेल्वे प्रशासनाला विनंती केली होती. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने सोमवारी रेल्वे कर्मचार्‍यांच्या संयमाचा बांध तुटला.

- Advertisement -

सोमवारी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून कर्जतसाठी रेल्वे कर्मचारी स्पेशल शटल ट्रेन निघाली. ही गाडी कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान आली असता,गाडीत बसायला जागा नसल्याचे पाहून कर्मचार्‍यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत गाडी रोखली. त्यानंतर रेल्वे अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांची समजूत काढून संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास गाडी कर्जतकडे रवाना केली.

मुंबई विभागात ३ कर्मचारी स्पेशल गाड्या कर्जत आाणि कसाराकरिता चालविण्यात येतात. कर्मचार्‍यांच्या उद्रेकानंंतर दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास आणखी एक गाडी चालविण्यात येणार आहे.
-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -