घरमुंबईरेल्वे तिकीट घरांना टाळे, दलालांचे फावले

रेल्वे तिकीट घरांना टाळे, दलालांचे फावले

Subscribe

आर्थिक पिळवणुकीमुळे प्रवासी संतापले

रेल्वे अधिकार्‍यांना कमिशन मिळावे, यासाठी रेल्वेच्या अधिकृत तिकीट खिडक्या बंद करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हार्बर लाइन येथील जुईनगर रेल्वे स्थानकाच्या अधिकृत तिकीट खिडक्या या कारणासाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेरील खासगी तिकीट बुकिंग खिडकीवरून तिकिटे घ्यावी लागत आहेत. त्याकरिता अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. या प्रकारामुळे प्रवासी संतापले आहेत.

सव्वा तेरा लाख कर्मचारी असलेल्या रेल्वेला तिकीट विक्रीसाठी कर्मचारी मिळत नाही. हार्बर लाईनमधील जुईनगर येथील उपनगरीय रेल्वे स्थानकावरील तिकीट घर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रेल्वे स्थानकाबाहेरील खासगी तिकीट बुकिंगसमोर रांगा लावाव्या लागत आहेत. त्या ठिकाणी मात्र प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये अतिरिक्त मोजावे लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील रेल्वे तिकीट खिडकी बंद होती. रेल्वेच्या या कारभाराविरुद्ध प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

याआधी मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी रेल्वे स्थानकावर कर्मचार संख्या कमी असल्याचे फलक लावून तिकीट खिडक्या बंद करण्यात आल्या होत्या. प्रवाशांनी याबाबत तक्रार केल्यानंतर खिडकी नियमित सुरू करण्यात आली. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी असते. सोबतच रेल्वेकडून विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. प्रवाशांना सेवासुविधांसह रेल्वे स्थानकावर तिकिटे देण्यापर्यंत सर्व सुविधांसाठी रेल्वे कर्मचारी आम्ही नियुक्त केले आहेत. त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही.

रेल्वे अधिकार्‍यांचा गलथान कारभार
रेल्वेची आर्थिक स्थिती नाजूक असून, ती सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रेल्वेच्या अनेक कामाचे अप्रत्यक्ष खासगीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस) नियुक्त करण्यात आले आहेत. रेल्वेच्या उदासी धोरणामुळे आणि रेल्वे अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे रेल्वे प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

प्रवाशांची आर्थिक पिळवणूक
रेल्वेने तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनारक्षित तिकीट विक्रीकरता जनसाधारण तिकीट बुकिंगसेवक (जेटीबीएस) नियुक्त करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मध्य रेल्वेचा मुंबई विभागात २७० जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक (जेटीबीएस) आहेत. महिन्याला या २७० जेटीबीएसकडून सरासरी ५ कोटींच्या घरात तिकीट विक्री केली जाते. तर प्रत्येक दिवसाला १ लाख ४९ हजार तिकीट विक्री केली होते. या माध्यमातून २ लाख ४१ हजार ७०८ प्रवासी प्रवास करतात. हे जेटीबीएस सेवक प्रत्येक तिकिटावर प्रवाशांकडून २ रुपये अतिरिक्त द्यावा लागत होता. मात्र नुकतेच रेल्वेने यांचे अधिकृत कमिशन सुद्धा आता १ रुपयांवरून २ रुपये वाढवले आहे. यातून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

रेल्वे स्वतःच्या अधिकृत तिकीट खिडक्या बंद करून खासगी लोकांचे खिसे भरण्याचे काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची आर्थिक पिळवणूक होत आहे. रेल्वेमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून रेल्वेच्या अधिकृत सर्व तिकीट खिडक्या सुरू कराव्यात.
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -