कार्यकर्त्याच्या आत्महत्येवर राज ठाकरे व्यथित; पुन्हा केली ‘ही’ विनंती

Mumbai
Raj Thackeray
राज ठाकरे यांची घोषणा

ईडीने बजावलेल्या नोटिसीचा आदर करुया, २२ ऑगस्टला शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन मनसे कार्यकर्त्यांना यापुर्वी देखील केले होते. मात्र आज ठाण्यात मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे स्वःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

या धक्कादायक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर अकाऊंटवरून प्रवीणच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, ‘आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं.’, असे देखील म्हटले आहे.

राज ठाकरेंनी केली ‘अशी’ विनंती

प्रवीण हा राज ठाकरेंचा प्रचंड चाहता होता. तो मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. त्यामुळे मनसेचा कोणताही कार्यक्रम असो किंवा आंदोलन असो, तो स्वतःच्या शरीरावर मनसेचा झेंडा रंगवून कार्यक्रमात सर्वात पुढे असायचा. प्रवीणच्या जाण्याने मनसेने फार मोठा निष्ठावंत कार्यकर्ता गमवला आहे. यावेळी राज ठाकरे असे म्हणाले की, ‘प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे.  पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की. ‘

कोणत्याही कृतीने सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

ईडी कडून कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा काही प्रश्न विचारायचे असल्यास त्यांनी योग्य ती उत्तरं देईन, असे राज ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे. ‘तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही. काल मी जे सांगितलं तेच पुन्हा सांगतो तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती राज ठाकरेंनी केली आहे.

बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची नीट काळजी घ्या, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.