राज ठाकरेंनी टाकलं महापौरांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात

Mumbai
Raj Thackeray Cartoon on BMC Mayor
राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातील महापौर

दिवाळीच्या निमित्ताने आपल्या व्यंगचित्रांचा धडाका लावणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या महापौरांना चक्क राणीच्या बागेतील प्राण्यांच्या पिंजऱ्यात दाखवले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्यात आहे आहे. यावरून राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी दुसऱ्यांदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा नुकतीच स्मारक ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली असून, महापौरांच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात येणार आहे.

काय आहे व्यंगचित्रात

राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्रामध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात दाखवण्यात आले असून, एक महिला आपल्या मुलाला घेऊन राणीच्या बागेत आल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच महापौरांच्या पिंजऱ्याजवळ येताच ती महिला मुलाला सांगते की, बाळा, त्यांना खायला घालू नकोस, ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत.

भारतमातेची मोदींकडे पाठ; राज ठाकरे यांच नवं कार्टून

स्मारकाविषयी थोडक्यात

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ज्या महापौर बंगल्यात बांधणार आहेत, त्या बंगल्याच्या मुळ ढाच्याला कुठलाही धक्का लावला जाणार नाही. विशेष म्हणजे या स्मारकामुळे महापौर बंगल्याच्या भिंतीदेखील उजळून निघणार आहेत. या बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर बाळासाहेबांच्या आठवणी पाहता येणार आहेत. महापौरांच्या बंगल्यातील ११ हजार ५५० चौरस मीटर जागेत स्मारक उभारले जाणार आहे. हा बंगला २३०० चौरस फूट जागेत बनलेला आहे. मात्र, स्मारक बांधण्यासाठी ९००० चौरस फुटांचा परिसर वापरला जाणार आहे. या बंगल्याचे तळघर स्मारकासाठी वापरण्यात येणार आहे. तळघरात स्मारक बनवले तर, बंगल्याच्या परिसरातील लॉन्ससुद्धा अबाधित राहिल, असे बाळासाहेब स्मारक ट्रस्टने स्पष्ट केले आहे. तसेच बंगला परिसरातील नोकर आणि वाहन चालकांची घरे पाडण्यात येतील. तेथे पर्यटकांसाठी इतर सोयी सुविधा करण्यात येणार आहेत. तसेच दक्षिण-पूर्वेला पार्किंगसाठी जागा ठेवण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here