और… सिर्फ राज चल रहा है

गुगल ट्रेंड, युटयूबवर फडणवीस, उद्धव, पवारांना मागे टाकले

Mumbai
google trends : raj thackeray related queries search increases he started anti bjp rallies
गुगल ट्रेण्डवर 'राज' सत्ता

देशात लोकसभेच्या प्रचार जसा शिगेला पोहचत आहे त्या जोडीलाच उमेदवारांना थोबाडीत लगावण्यापासून पत्रकार परिषदांमध्ये चपला फेकण्याच्या प्रकाराची एका बाजुला खमंग चर्चा आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात मात्र ऑफलाईन सभा असो किंवा ऑनलाईनचा इंटरनेट, सोशल मिडिया असो एकच नेता ट्रेंडिंग आहे तो म्हणजे राज ठाकरे. महाराष्ट्रातील ठिकठिकाणांच्या सभांसाठी जशी तुडुंब गर्दी होत आहे, त्याच तोडीला राज ठाकरे ऑनलाईन विश्वातही किंगमेकर ठरत आहे. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेचा डंका हा युट्युबपासून ते वेबसर्चमध्ये जोरदार वाजत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळालेली बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हीदेखील राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या तुलनेत पिछाडीवर पडली आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उदयनराजे नेटकरांच्या पसंतीला उतरले आहेत.

गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यात सर्वाधिक युजर्स हे राज ठाकरे यांना युट्युबवर शोधत आहेत. लोकप्रियतेत राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पिछाडीवर टाकले आहे. तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते शरद पवार यांच्यापेक्षाही राज ठाकरे यांची मोठी क्रेझ युट्युबवर आहे. राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्याला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यासोबतच राज ठाकरे यांची नांदेड आणि सोलापूरची सभाही मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली आहे. राज ठाकरे यांचे लाईव्ह भाषण सर्च करणारे बरेच नेटकर आहेत. सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांचाही फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात युट्युबवर आहेत. उदयराजे भोसले यांच्या प्रसारमाध्यमांमधील मुलाखती, उदयनराजे यांचे गाणे, त्यांच्याशी संबंधित बातम्याही नेटवर मोठ्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांची आप की अदालत ही प्रसारमाध्यमांधील मुलाखत सर्च करण्यात आली आहे.

उर्मिला मातोंडकर होतेय सर्च

लोकसभेच उत्तर मुंबईतून तिकिट मिळालेली उर्मिला मातोंडकरही गेल्या पंधरवड्यात गुगल ट्रेंडमध्ये आली आहे. पण युट्युबवर उर्मिला मातोंडकरच्या तुलनेत राज ठाकरे हे सरस ठरले आहेत. उर्मिला मातोंडकरचा धर्म शोधण्यापासून गुगलवर नेटकरांनी अनेक वैयक्तिक माहितीही शोधली आहे. त्यामध्ये उर्मिला मातोंडकरचे लग्नानंतरचे वय, उर्मिला मातोंडकरच्या पतीचे नाव, तिच्या पतीचे वय, उर्मिला मातोंडकरचे हिंदुत्वावर भाष्य अशा पद्धतीची माहितीही नेटकरांनी सर्च केली आहे.

आज हनुमानही ट्रेंडिंगमध्ये

राजकीय भाषण, घडामोडी मोठ्या प्रमाणात एकीकडे होत आहेत, पण हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमानही आज दिवसभर ट्रेंडिंग आहे. छत्तीसगढ, दादरा नगर हवेली, दमण दीव, दिल्ली, सिक्कीम याठिकाणी हनुमान इंटरनेटवर शोधण्यात आला आहे. हनुमान जयंतीच्या मराठीतील शुभेच्छा गुगलवर शोधण्यापासून ते अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान हे गाणही युट्युबवर शोधण्यात आले आहे. तसेच उदित नारायण, हरिहरन या गायकांच्या आवाजातील हनुमान चालीसा इंटरनेटवर सर्च झाली आहे. आज दिवसभरात १० लाखांहून अधिक वेळा हनुमान हा शब्ध शोधण्यात आला आहे. हनुमान चालीसा, हनुमान फोटो, बाल हनुमान हेदेखील नेटकरांकडून आज शोधण्यात आले.