घरमुंबईमनसे अजूनही तळ्यात-मळ्यात

मनसे अजूनही तळ्यात-मळ्यात

Subscribe

भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे घेणार निर्णय

आंगणेवाडी जत्रा…सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी ही जत्रा..जसे कानाकोपर्‍यातून सर्वसामान्य भाविक भराडी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी आंगणेवाडीला जातात तसेच राजकारणीदेखील भराडी देवीच्या दर्शनासाठी जातात. मात्र यंदा या जत्रेला खास महत्व आहे ते म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे. मुंबईत राहणारे आणि विशेषतः तळ कोकणाशी नाळ जोडलेले राजकारणी यंदा मात्र भराडी देवीला नवस बोलण्यासाठी आवर्जून जाणार आहेत. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश आहे.

शुक्रवारपासून पुणे, कोल्हापूर आणि कोकण दौर्‍यावर असलेले राज ठाकरे आंगणेवाडी जत्रेला जाऊन भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मुंबईत येऊन लोकसभा निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही आणि लढवली तर किती जागा लढवायच्या याबाबत अजूनही मनसेत संभ्रम असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. नुकतीच राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत जरी राज ठाकरेंनी तयारी लागा, असे म्हटले असले तरी त्यांचा लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीकडे फोकस जास्त असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

म्हणून मनसेच तळ्यात-मळ्यात
भाजप शिवसेना युतीची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यासाठी जरी अनुकूलता दाखवली असली तरी काँग्रेसची भूमिका मात्र अजूनही अस्पष्ट आहे. त्यामुळे अजूनही महाआघाडीकडून कोणताही निर्णय समोर आला नसून, मनसेत अजूनही संभ्रमाचे वातावरण असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मनसेमध्ये संभ्रम असण्यामागील कारणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट झाली, पण आघाडीत जाणार का अजून नक्की नाही.
मनसेला राष्ट्रवादी आघाडीत घेणार, पण काँग्रेस घेणार का?
महाआघाडीत घेतले तर किती आणि कोणत्या जागा हेदेखील अस्पष्ट
आघाडीत जाऊन एक-दोन जागा लढायच्या की एकटे राहून जास्त जागा लढायच्या यावरही मनसेत अजून एकमत नाही.

- Advertisement -

2014 मध्ये राज मोदी समर्थक
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये राज ठाकरे यांनी मोदींना सपोर्ट केला होता. जर आपले उमेदवार निवडून आले तर ते मोदींना समर्थन करतील अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

2014मधील मनसेचे लोकसभेचे उमेदवार
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर
उत्तर पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण – राजीव पाटील
शिरूर – अशोक खंडेभराड
नाशिक – डॉ. प्रदीप पवार
पुणे – दिपक पायगुडे

काँग्रेसच्या उत्तर भारतीय नेत्यांचा मनसेला विरोध
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काँग्रेसच्या उत्तर भारतीय नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याने ही गाडी अजूनही पुढे सरकलेली नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीदेखील मनसेला विरोध केला आहे. तर सपाचे अध्यक्ष अबू आझमी यांनीदेखील मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध केला आहे. तसेच नेहमीच मनसेने हिंदी भाषिकांना आपले लक्ष्य केले आहे. त्यामुळे मनसेला महाआघाडीत घेतल्यास त्याचे इतर राज्यांमध्ये विशेष करून उत्तर भारतीय राज्यांमध्ये उमटतील व काँग्रेसला फटका बसेल, या भीतीने काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -