सल्ला घेण्यासाठी रामदास आठवलेंनी घेतली शरद पवारांची भेट

'रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेद दूर सारण्यासाठी मध्यस्थी करावी', असे शरद पवार म्हणाले आहेत.

Mumbai
ramdas athawale and sharad pawar
सल्ला घेण्यासाठी रामदास आठवलेंनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस होऊन गेले. मात्र, अध्यापही राज्यातील स्थिर सत्ता स्थापनेचा तिढा सूटलेला नाही. दरम्यान, या परिस्थितीत हा तिढा कसा सोडवता येईल? याबाबत सल्ला घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले आणि तिथे त्यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भेटीमागचे कारण विषद केले. दरम्यान, शरद पवार यांनी देखील रामदास आठवले यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला. ‘रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेद दूर सारण्यासाठी मध्यस्थी करावी’, असे शरद पवार म्हणाले आहेत.


हेही वाचा – अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं – नितीन गडकरी


 

काय म्हणाले रामदास आठवले?

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचे आणि आमचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. राजकीय स्थरावर आम्ही वेगळे असलो तरी व्यक्तीगत पातळीवर आमचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकीय वातावरण बिघडलेले असल्यामुळे त्यावर तोडगा निघने जरुरीचे आहे. शरद पवार यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. गेले अनेक वर्ष ते महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आहेत. आता जवळपास १४ दिवस होत आले आहेत आणि भाजप-शिवसेनेचे एकमत होताना दिसत नाही. अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीच्या मुद्द्यावर शिवसेना अडलेली आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार नाही. त्यामुळे अशा अडचणींच्या काळात काय करणे आवश्यक आहे? याबाबत सल्ला घेण्यासाठी मी पवार साहेबांकडे आलो होतो’, असे रामदार आठवले म्हणाले.

शिवसेना आणि भाजपने आठवलेंचा सल्ला घ्यावा – शरद पवार

‘आता आठवले साहेबांनी जे सांगितले ते शंभर टक्के बरोबर आहे. आता महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ते दुरुस्त होणे जरुरीचे आहे. शेवटी महाराष्ट्रासारख्या सरकार मध्ये अशी परिस्थिती राहू नये. रामदास आठवलेंना याबाबत चिंता वाटत आहे आणि या परिस्थितीवर तोडगा निघावा त्यासाठी ते आले. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत दिले आहे त्यामुळे त्यांनी सरकार बनवावं. त्यादृष्टीकोनाने त्यांनीही प्रयत्न करावे. रामदास आठवले यांचे राजकारणात वेगळे स्थान आहे. प्रत्येक पक्षाकडून त्यांची नोंद घेतली जाते. त्यामुळे आता या स्थितीत त्यांचा सल्ला शिवसेना आणि भाजपने घ्यावा आणि सत्ता स्थापन करावे’, असे शरद पवार म्हणाले.