‘मी होतो म्हणून थोडक्यात वाचले शरद पवार…!’

Mumbai
ramhari rupnawar with sharad pawar

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी विधानपरिषदेतून निवृत्त होणार्‍या आमदारांचा निरोप समारंभ सुरु होता. काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर हे मागच्या सहा वर्षातील आठवणींना उजाळा देत होते. यावेळी त्यांनी सांगितलेली आठवण सर्वांनाच अवाक करुन गेली. माझ्यामुळे एकदा शरद पवार थोडक्यात बचावले होत, असे त्यांनी म्हणताच सभागृहातील सर्व आमदारांचे कान टवकारले गेले. रुपनवर यांनी असे काय केलं होतं, ज्यामुळे शरद पवार बचावले… किस्सा ऐकण्यासाठी सर्व सदस्य आतूर झाले होते आणि रुपनवर यांनी किश्शाला सुरुवात केली.

“१९७५ ची गोष्ट आहे. मी बारामतीमध्ये शिक्षण घेत होतो. कॉलेजचं वय होतं. एकेदिवशी बारामतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मी देखील सभेला गेलो. मात्र, स्थानिक राजकारणातून वाद होऊन लोकांनी सभा उधळून लावली. शरद पवारांच्या बारामतीत गोंधळ झाल्यामुळे ते चिंतेत होते. लोकांना शांत करण्यासाठी ते सैरावैरा धावत होते. एक मंत्री कसा धावतोय, या उत्सुकतेपोटी मी देखील त्यांच्या मागोमाग उगाच धावत होतो. रात्री एक दीडच्या दरम्यान दगडाच्या एका साच्यावर पवार चढले आणि लोकांना हाताने शांत रहा, असे आवाहन करत होते. तेवढ्यात दगडाचा साचा ढासळला आणि पवारांचा तोल गेला. मी बाजूलाच असल्यामुळे तात्काळ समोर गेलो. पवारांनी माझ्या खांद्याचा आधार घेऊन स्वतःला सावरले आणि पुढच्या क्षणाला परत लोकांमध्ये मिसळले.”

सभागृह रुपनवर यांच्या किश्श्यात अगदी रंगले होते. मात्र, खरी गमंत तर पुढे होती. रुपनवर म्हणाले की, “मी शाळेत असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे शेती, नोकरी करत शिक्षण घेतले. १० वर्ष वकिली केली. ग्रामसभा सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा टप्पा गाठला. आमदार झालो. तरीही आजतागायत कधीही पवारांना त्या प्रसंगाची आठवण करुन देता नाही आली. दोनदा प्रयत्न केला, पण संधीच मिळाली नाही.”

पुढे ते म्हणाले, “२०१४ साली एका कार्यक्रमात मला संधी मिळाली आणि पवारांना मी १९७५ ची आठवण करुन दिली. तेवढ्यात पवार म्हणाले की, तो मुलगा तू होतास का? मी आजतागायत मला आधार देणार्‍या त्या मुलाला हुडकत होतो… पवारांचे ते शब्द ऐकून मला तेव्हा आभाळही ठेंगणे वाटू लागलं. मी तुम्हाला याआधी सांगण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटल्यावर पवारच म्हणाले की, तुम्ही मोहोळच्या सभेदरम्यान माझ्या गाडीजवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मी घाईत असल्यामुळे बोलू शकलो नाही.”

रामहरी रुपनवर हे अकलूजचे असून काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. आपल्या आमदारकीबाबत बोलताना ते म्हणाले की, “मी राज्यपाल नियुक्त आमदार झाल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. ना निवडणूक, ना मतदान, ना खर्च.. थेट आमदार तेही वरिष्ठ सभागृहात. एका तालुक्यात अडकवण्यापेक्षा संबंध महाराष्ट्र हाच मतदारसंघ..” आपल्या जीवनातील संघर्ष आणि राजकारणातील टप्पे सांगत रुपनवर यांनी सभागृहाचा निरोप घेतला.