उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रश्मी बागल, निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

Mumbai
rashmi bagal
राष्ट्रवादीच्या रश्मी बागल शिवसेनेत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे सत्र सुरुच आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये इतर पक्षातील नेत्यांचे इनकमिंग होत असताना आणखी दोन राजकीय नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल आहे. आज, बुधवारी मातोश्रीवर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल आणि काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रश्मी बागल या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री दिवंगत दिगंबर बागल यांची कन्या आहेत.

nirmala gavit
निर्मला गावित

पक्षप्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

पक्ष वाढत आहे. चांगले सहकारी येत आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम करायचे आहे. मी रश्मी बागल यांचे स्वागत करतो. आता पक्ष बळकट करण्यासाठी भगवा फडकवू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी रश्मी बागल यांच्या प्रवेशानंतर दिली. तर निर्मला गावित यांनीही आज सहकुटुंब शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माणिक राव गावित हे काँग्रेसमधील मोठं घराणं आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कुटुंबावर प्रेम केलं होतं. निर्मला गावित पक्ष बांधणीसाठी पुढे काम करतील. उत्तर महाराष्ट्र हे शिवसेनेचे प्राबल्य आहेच. पण निर्मला गावित यांच्या येण्याने राहिलेली उणीवही भरून निघेल. शिवसेनेच्या जागा किती येतील माहीत नाही, मी अंदाज बांधत नाही, पण जिंकायचे म्हणजे जिंकायचे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गावितांनी दिला होता आमदारकीचा राजीनामा 

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. निर्मला गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. गावित यांचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश करु, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. राजीनामा अध्यक्षांकडे सुपुर्त करत असताना निर्मला गावित यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.