महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ, १ कोटी ३४ लाखांचा घोटाळा!

Shahapur
Shahapur Ration Rice Scam

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची भात भरडाई प्रक्रिया कशी भ्रष्टाचाराने बरबटली आहे याचा पर्दाफाश झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळेगाव येथील धनंजय राईस मिलच्या नावाने शहापूर येथील शासकीय गोदामात येणारा तांदूळ हा प्रत्यक्षात कर्नाटक येथून येत असल्याचे समोर आले आहे. या तांदळाच्या पूर्ण व्यापारात मोठा आर्थिक गैरव्यवहार असून यात अनेक अधिकारी सामील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शासन निर्णय आणि केंद्र सरकारच्या आदेशांना पायदळी तुडवून बारदान ऐवजी प्लास्टिक बॅग्समध्ये हे तांदूळ आणले जात आहेत. हेच तांदूळ रेशनवर जात असून महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ असे धक्कादायक चित्र आज समोर आले आहे. तब्बल १ कोटी ३४ लाख रुपयांचा हा धनंजय मिलर्स घोटाळा श्रमजीवीच्या तरुणांनी समोर आणला आहे.

५० किलोच्या ५०० बॅगा

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शहापूरच्या शासकीय गोदामात गैरव्यवहाराचा हा तांदूळ येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांना मिळाली. ही माहिती मिळताच भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे आणि श्रमजीवी संघटनेच्या टीमने रविवारी उशीरा गोदामात धडक दिली. यावेळी याठिकाणी कर्नाटक नोंदणीकृत असलेली मोठी ट्रक तांदूळ उतरवताना सापडली. या ट्रकमध्ये प्लास्टिकच्या बॅग मध्ये ५० -५० किलोच्या ५०० बॅग आणण्यात आल्या होत्या. वाहन चालक मोहम्मद जफर याला विचारले असता हा सगळा तांदूळ कर्नाटकच्या हुबळी येथून तेथील ब्रोकर मार्फत आणला असल्याचे त्याने सांगितले.

कर्नाटकमधून आला तांदूळ!

येथील शासकीय गोदाम पालक एस. व्ही. भगत यांना विचारले असता त्यांनी हे तांदूळ धनंजय राईस मिल तळेगाव जि. रायगड यांच्यामार्फत आले असल्याची माहिती दिली. ट्रान्स्पोर्ट पासवर देखील रायगड येथून आल्याचे नमूद होते. मात्र प्रत्यक्षात हे तांदूळ कर्नाटक वरूनच आल्याचे निष्पन्न झाले. श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी हा घोटाळा ऐरणीवर आणला असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी जयसिंग वळवी यांना माहिती देऊन त्यांनी पाठवलेल्या पुरवठा निरीक्षक शहापूर यांनी पंचनामा केला आणि श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांचा तसेच कर्नाटक येथील चालकाचा जबाब घेऊन सदर प्रकरणाबाबत वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगितले.