Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई …मात्र त्या मनातील वेदनाही कमी झाल्या !

…मात्र त्या मनातील वेदनाही कमी झाल्या !

ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रेंची प्रतिक्रिया

Mumbai

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत होत आहे. मात्र त्या वेळेस ठाणे जिल्हयातून कारसेवक म्हणून गेलेल्या शिवसैनिकांना अटक होऊन नऊ दिवस जेल भोगावी लागली होती, त्यात डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे हे सुध्दा होते. त्यानंतर भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाल्यानंतर, नगरसेवक म्हात्रे यांनाही अटक झाली होती, त्या काळात त्यांना तीन महिने जेलमध्ये राहावे लागले होते. पोलिसांकडून बेदम मार मिळाला, शॉक ही मिळाला… पण न्यायालयाच्या निर्णयानंतर, त्या वेदना कमी झाल्या अशी प्रतिक्रिया नगरसेवक म्हात्रे यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या कारसेवकांना झाशी येथे अडवण्यात आले होते त्यात नगरसेवक म्हात्रे हे सुध्दा होते. त्यावेळी त्यानां 9 दिवस जेलमध्ये राहावं लागले. भाजपचे नेते आडवाणी यांना अटक झाल्यानंतर, डोंबिवलीत पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली. कारसेवक म्हणून आमची नावे असल्याने, त्यावेळी केवळ शिवसैनिक म्हणून आमच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. त्यावेळी पोलिसांकडून आम्हाला बेदम मारहाण झाली. शॉकही दिले गेले. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र या गुन्हयाचा निकाल 1996 साली लागला, त्यात पाचही शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता झाली आहे असे म्हात्रे यांनी सांगितले. शिवसैनिकांना बेदम मारहाण झाली, त्यांना शॉक दिले, ही बातमी ज्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर पडली, त्यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना सांगितली आणि तत्कालीन कामगार मंत्री साबीरभाई शेख यांना तातडीने पाठवले, साबीरभाईंनी जेलमध्ये येऊन आमची भेट घेतली, आमच्यावर उपचार करण्यासाठी औषध साहित्य आणून दिले. अशी आठवणही नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितली, आज बाळासाहेब असते तर न्यायालयाच्या निर्णयाचा त्यांनाही खूपच आनंद वाटला असता अशा शब्दात म्हात्रे यांनी बाळासाहेबांची आठवण जागवली.

…आता तरी शिवसैनिकांना त्रास देऊ नका
केवळ शिवसैनिक म्हणून आमच्यावर खोटा दावा दाखल करण्यात आला होता. 27 वर्षानंतर न्यायालयाकडून आमची निर्दोष सुटका झाली आहे. त्या निकालाची प्रतही नुकतीच विष्णुनगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. अयोध्देचा निकाल लागला आहे. कलम 144 लावण्यात आले आहे. तरी शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून नाहक त्रास देऊ शकतात. आम्हाला अटक होऊ नये याची दखल घ्यावी अशी विनंतीही म्हात्रे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विधीमंडळ गटनेता एकनाथ शिंदे यांना एसएमएसद्वारे केली आहे.