कोविड ड्युटीनंतर नायर डेंटल रुग्ण सेवेसाठी सज्ज

 डॉक्टर, रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेत उपचार सुरू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिकेचे नायर दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे रुपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा स्थिर असलेला आकडा आणि दाताच्या रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता नायर दंत वैद्यकीय रुग्णालयातील कोरोना कक्ष बंद करून रुग्णालय पुन्हा रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र अद्यापही रुग्णांच्या मनामध्ये भिती असल्याने रुग्णांची संख्या वाढलेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत महापालिकेच्या नायर दंत वैद्यकीय रुग्णालयाने कोरोना योद्ध्यांसाठी दोन कोरोना कक्ष सुरू केले. यामध्ये सुरुवातीला डॉक्टर, परिचारिका व हेल्थकेअर वर्कर यांच्यावर उपचार करण्यात येत होते. परंतु परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी पुढाकार घेत सर्वसामान्य कोरोना रुग्णांसाठीही ३० खाटांचा आणखी एक विशेष कक्ष सुरू केला. कोरोना रुग्णांसाठी डेंटल हॉस्पिटल उपलब्ध करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली पालिका ठरली. दात दुखणे, तुटलेला दात, रुट कनाल, दात हलतोय, अक्कल दाढ काढणे, लहान मुलांच्या दातांचे विविध आजार यासदर्भातील अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये येतात. कोरोनामध्ये एक दिवस आड विविध विभाग सुरू ठेवण्यात येत होते. मात्र कोरोनाच्या भितीमुळे रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये आठवड्याला १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यामुळे वाढते रुग्ण व कोरोना रुग्णांची स्थिर असलेली स्थिती लक्षात घेऊन नायर दंत रुग्णालय प्रशासनाने तिन्ही विशेष कोरोना कक्ष नुकतेच बंद केले. त्यानंतर रुग्णालयातील प्रत्येक मजला, वस्तू, साहित्य निर्जंतूक करून रुग्ण सेवेला सुरुवात केली आहे. रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाकडून सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येत आहे. डॉक्टरांचा रुग्णांच्या थेट तोंडाशी संपर्क असल्याने डॉक्टरांना साधा मास्क, एन९५ मास्क, फेस शिल्ड, पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे उपचारापूर्वी रुग्णांची तपासणी करण्यात येते. दातावर उपचार करताना रुग्णांच्या तोंडातून बाहेर पडणारे कण कोणाच्या संपर्कात येऊ नये यासाठी हेपा फिल्टर व फॉगर बसवले आहेत. उपचारानंतर प्रत्येक खूर्ची निर्जंतूक केली जाते.

रुग्णालयातील सर्व विभाग व्यवस्थित सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक दिवसाच्या शेवटी ओपीडीपासून हॉस्पिटलच्या सर्व इमारतीमध्ये धूरफवारणी करण्यात येते. त्याचप्रमाणे आठवड्यातून तीन वेळा पालिकेच्या ई वॉर्डकडून संपूर्ण इमारत निर्जंतूक केली जाते. सध्या डॉ. नीलम आंद्राडे यांच्याकडे नेस्को येथील जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील सर्व कारभार चालवण्यात येत असल्याची माहिती नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी दिली.

कोरोनामध्ये परीक्षा सुरळीत पार पाडल्या

कोरोनामध्ये घरातून बाहेर पडणे शक्य नसताना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षाही महाविद्यालयाकडून सुरळीतरित्या पार पाडण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आल्याची माहिती नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी दिली.