Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पोलिसांच्या १२ हजार ५३८ जागांची भरती

पोलिसांच्या १२ हजार ५३८ जागांची भरती

पहिल्या टप्प्यात ५३०० जागा भरणार

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या कारणास्तव मागे पडलेली पोलीस भरती लवकरच करण्याचे सूतोवाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पोलीस दलातील विविध गटातील १२ हजार ५३८ जागांसाठी ही भरती होणार असून पहिल्या टप्प्यात ५३०० जागा भरल्या जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.

पोलीस दलातील रिक्त असलेल्या जागा भरण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय गृह खात्याने गेल्या महिन्यात घेतला होता. यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती केली जाणार होती. मात्र, तेव्हाच मराठा आरक्षणातील एसईबीसीचा मुद्दा पुढे करत भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, यामुळे पोलीस दलावरील ताण वाढत असल्याची बाब पुढे आली होती. यामुळेच नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाला घ्यावा लागला होता. पहिल्या टप्प्यातील भरती झाल्यावर दुसर्‍या टप्प्यातील भरतीला सुरुवात केली जाईल, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

१२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

२०१९मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

- Advertisement -

दरम्यान, २०१९च्या पोलीस भरतीकरिता एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाने ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात आला होता. राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच कोरोनामुळे पोलिसांवर कामाचा अधिकचा ताण आला आहे. शिवाय अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर ही भरती तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -