घरमुंबईमहावितरणच्या वीज गळतीमध्ये कपात

महावितरणच्या वीज गळतीमध्ये कपात

Subscribe

विजेची हानी १४.३७ टक्क्यांवरून १२.४० पर्यंत झाली कमी

संपूर्ण राज्यात वीज यंत्रणेचे नवीन जाळे विकसित करतानाच बिलिंगच्या पद्धतीमध्ये झालेल्या सुधारणांमुळे महावितरणला गेल्या वर्षात विजेची गळती कमी करण्यामध्ये यश मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये विजेची तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी १४.३७ टक्क्यांवरून १२.४० टक्क्यांवर आणण्यात महावितरणला यश मिळाले आहे.

विजेच्या हानीमध्ये प्रामुख्याने बिलिंगच्या पद्धतीत असणार्‍या उणीवा समोर आल्या होत्या. त्यामुळेच वीज बिलिंगच्या पद्धतीवर मुख्य लक्ष केंद्रित करण्यात आले. वीज मीटर बिलिंगचा विषय सोडवण्यासाठी नियोजनबद्ध पुढाकार घेतल्यामुळे या मीटर रिडिंगमधील त्रुटी कमी करणे शक्य झाले. अनेकदा मीटर रिडिंगच्या कामामध्ये होणार्‍या दिरंगाईमुळेच बिलिंगच्या सिस्टिममध्ये अडचणी निर्माण होत होत्या.

- Advertisement -

एका दिवसाच्या फरकामुळेही वीजबिले उशिराने जाण्यावर त्याचा परिणाम व्हायचा. पण मीटर रिडिंगमध्ये झालेल्या सुधारणांमुळे ही यंत्रणा नियोजनबद्ध कालावधीत कार्यरत होणे आता शक्य झाले. सेंट्रल बिलिंग सिस्टिमचा फायदाही बिलिंग यंत्रणा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे एकाचवेळी वीजबिले तयार होण्यासाठीही मदत झाली. अनेक भागात मीटरमधील दोष पाहता मोठ्या प्रमाणावर मीटर दुरुस्तीची कामे करण्यात आली. त्याचा परिणामही महसूल वाढीवर झाला. मुख्यत्वेकरून ऑटोमॅटिक मीटर रिडिंग आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर रिडिंगमुळे मीटर रिडिंगमधील दोष कमी होण्यासाठी मदत झाली. महत्वाचे म्हणजे सरासरी वीजबिल देण्याचे प्रकार कमी करण्यात यश आल्याची माहिती महावितरणचे संचलन विभागाचे संचालक दिनेश साबू यांनी दिली.

वीज चोरांविरोधात सातत्याने थकबाकी वसुली मोहिमा राबवण्यात आल्या. त्याचा फायदाही वीजबिलातील वसुली वाढण्यासाठी झाला. अनेक भागात पायाभूत सुविधा विकास योजनाअंतर्गत नवीन सबस्टेशन, वीज वाहिन्या तसेच फीडर सेपरेशनसाठी झालेल्या कामांचा फायदा हा यंत्रणेतून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी झाला. अनेकदा ओव्हर लोडिंगमुळे होणारे वीज यंत्रणेचे नुकसान पाहता नवीन प्रकल्पांअंतर्गत झालेली यंत्रणा उभारणी ही वीजहानी कमी करण्यासाठी उपयोगी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सर्वाधिक वीज गळतीचे झोन
जळगाव जिल्हा वीजहानीमध्ये सर्वात अग्रस्थानी आहे. जळगावमध्ये २२.१९ टक्के इतकी विजेची हानी आहे. तर जळगाव पाठोपाठ नांदेड, लातूर आणि बारामती या झोनचा समावेश आहे. या सगळ्या झोनमध्ये सातत्याने प्रयत्न होत असतानाही वीज गळती कमी होण्याऐवजी वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -