घरमुंबईठामपच्या फायलींवर आधुनिक तंत्राची नजर

ठामपच्या फायलींवर आधुनिक तंत्राची नजर

Subscribe

‘रेफिड टॅग’मुळे माहिती मिळणार एका क्लिकवर

वारंवार गहाळ होणार्‍या नस्त्या आणि शोधूनही न सापडणार्‍या फायलींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेने उपाय शोधून काढला आहे. हा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रेडिओ फ्रिक्विन्सी आयडिंटीफिकेशन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठामपातील सर्व उपक्रम आणि प्रकल्पांच्या फायलींचा प्रवास समजायला मदत होणार आहे. याकरिता ठाणे महापालिकेला सुमारे 6 कोटी 91 लाख 90 हजार 362 रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाकरिता महापालिका 500 सेन्सॉर मशिन्स आणि फाईलला डकवण्यासाठी 15 लाख टॅगची खरेदी करावी लागणार आहे. या प्रणालीमध्ये जुन्या फायलींचाही समावेश केला जाणार आहे. सर्व फाईल्स डिजिटल स्वरूपात कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेतील कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. त्यामुळे या कामाकरिता किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. ही प्रणाली महापालिकेत विकसित करण्यात आल्यानंतर फाईल गहाळ होण्याच्या तक्रारी कमी होतील. असे ठामपाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

प्रत्येक विभागात तयार होणार्‍या फाईल्स तसेच महत्त्वाच्या नस्त्यांवर रेफिडचा टॅग डकवण्यात येणार आहे. ही फाईल रेफिड या हार्डवेअर स्कॅनरवरून फिरवल्यानंतर त्या टॅगची अणि संपूर्ण कामाच्या फाईलची माहिती डिजिटल स्वरूपात संगणकावर साठवून ठेवली जाणार आहे. त्यासाठी महापालिका विशेष संगणक प्रणाली विकसित करणार आहे. त्यानुसार फाईलचा प्रत्येक विभागातील प्रवास रेफिड यामार्फत केला जाणार आहे. ही कारवाई प्रत्येक विभागातील आवक-जावक लिपिकामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे ही फाईल कोणत्या विभागात आहे. या फाईलवर काय कारवाई झाली, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्याचबरोबर ही फाईल हरवली किंवा फाईलच्या गठ्ठ्यात कुठे असेल तर गठ्ठ्यातून शोधून काढण्यासाठी सेन्सॉर असलेल्या हँड हेल्डर या रिडर हार्डवेअरच्या माध्यमातून तातडीने सहज शोधणे शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे फाईलची सुरक्षितता आणि फाईल हरवण्याच्या सबबी दूर होतील. असा प्रशासनाचा दावा आहे. त्याचबरोबर एखाद्या विभागाकडे असलेल्या फाईलची माहितीही या प्रणालीमुळे सहज मिळणे सोपे होणार आहे. संगणकाच्या एका क्लिकवर कार्यालयात बसून ठामपा आयुक्त कोणतीही माहिती घेऊ शकणार आहेत. प्रत्येक विभागाची माहिती घेण्यासाठी अधिकार्‍यांना वारंवार बोलवावे लागणार नाही, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -