जीर्ण इमारत रिकामी करण्यास नकार

पालिका अधिकारी हतबल

Mumbai

मुंब्रा कौसा परिसरातील 160 इमारती या जर्जर झालेल्या आहेत. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. याचदरम्यान अतिधोकादायक इमारत ख्वाजा पॅलेस इमारतीत खोलीचा स्लॅब कोसळला. मात्र, इमारत खाली करण्यासाठी सोमवारी आलेल्या मुंब्रा प्रभाग समितीच्या पथकाला नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट न करता इमारतीत राहणार्‍या रहिवाशांवर अपघाताची टांगती तलवार असल्याचे चित्र आहे.

अनेक आठवड्यापूर्वी कौसा घासवाला कंपाउंड, अल्मास कॉलोनी येथील ख्वाजा पॅलेस नावाच्या इमारतीच्या सी विंग मधील खोलीचे छत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिकारी यांना मिळताच त्यांनी इमारत खाली करण्यासाठी पथकासह पोहचले असता रहिवाशांनी मात्र तीव्र विरोध करण्यात आला. या ख्वाजा पॅलेसमध्ये 22 रहिवासी राहत आहेत. पालिका पथकाला त्यांनी इमारत खाली करणार नाही आणि इमारतीची दुरुस्ती आम्ही स्वतःच करू असे सांगितले. मात्र इमारत खाली करून देणार नाही. त्यामुळे पालिका पथक आणि रहिवासी समोरासमोर आले. दरम्यान, इमारत जर्जर झालेली आहे. तसेच इमारतीच्या सदनिकेत छत कोसळल्याने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली असल्याचे पालिका पथकाने स्पष्ट केले. मात्र, रहिवासी इमारत खाली करून दुरुस्ती करण्यास नकार देत आहेत.

कौसा घासवाला कंपाउंड, अल्मास कॉलोनी येथील ख्वाजा पॅलेस नावाच्या इमारतीच्या खोलीचा छताचा भाग कोसळला. कौसामध्ये 160 इमारती जर्जर झालेल्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. मात्र, ख्वाजा पॅलेस इमारतीचे छत कोसळले. त्यामुळे इमारत खाली करून दुरुस्ती आवश्यक आहे. कारण मुंब्यात इमारती पडून मोठी जीवितहानीच्या घटना सर्वाधिक झाल्या आहेत. प्रसंगावधान बाळगणे महत्वाचे आहे. मात्र रहिवाशी इमारत सोडण्यास तयार नाहीत.
-धनंजय गोसावी, कार्यकारी अभियंता, मुंब्रा प्रभाग समिती