जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा नातेवाईकांचा आरोप

डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत हॉस्पिटलमध्ये घातला गोंधळ

patient relatives abuses lady doctor in kem hospital mumbai

केईएम हॉस्पिटलमध्ये 7 सप्टेंबरला गंभीर स्थितीमध्ये दाखल झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, तरुण जिवंत असूनही त्याला मृत घोषित केल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. तसेच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर महिलेला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत तिच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरला झाला. रुग्ण अत्यावस्थ स्थितीत आलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु तरुण मृत असूनही नातेवाईकांकडून झालेला प्रकार हा निषेधार्ह असल्याचे केईएम हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच या प्रकाराबाबत केईएमच्या मार्डच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त करत निषेध केला.

रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, जतिन परमार (वय १८) तरुणाला ताप येत असल्याने खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्याला तीन वेळा फिट आली. प्रकृती बिघडत असल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्याने त्याला 7 सप्टेंबरला रात्री 9 वाजता केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. फिटमुळे त्याच्या पोटातील घटक त्याच्या श्वसननलिकेत आणि फुफ्फुसात गेल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्याला फिटचाही त्रास होता. त्याच्या नातेवाईकांना त्याची परिस्थिती समजावून सांगत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तातडीने जतिन परमारला व्हेंटिलेटरवर ठेवले. त्याला अ‍ॅन्टिबायोटिक, अ‍ॅण्टी फिट औषधे आणि सलाईन लावण्यात आली. तसेच त्याचा रक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांची देखील त्याच्या नातेवाईकांना वेळोवेळी माहिती दिली जात होती.

९ सप्टेंबरला पहाटे १ वाजून २० मिनिटांनी रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचे निधन झाले. जतिनचा ईसीजी रिपोर्ट काढून त्याच्या निधनाची माहिती त्याचा भाऊ आणि मामाला दिली. १५ ते २० मिनिटांनंतर त्यांचे ३० ते ४० नातेवाईक अचानक आयसीयूमध्ये शिरले आणि त्यांना कोणतीही माहिती न देता रुग्णाला मृत घोषित केल्याचा दावा करू लागले. त्यांनी ईसीजी रिपोर्ट फाडला आणि उपस्थित निवासी डॉक्टर महिलेला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करून तिच्या अंगावर धावून गेले. त्याचप्रमाणे रुग्ण अद्यापही जिवंत असल्याचा दावा करत त्यांनी व्हेंटिलेटर पुन्हा सुरू करण्यास लावले. व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर त्यावर ग्राफ दिसू लागल्यावर नातेवाईक अधिकच आक्रमक होत शिवीगाळ करू लागले.

अंगावर धावून जाऊ लागले. मात्र, कोणताही व्हेंटिलेटर सुरू केल्यानंतर तो रुग्णाला लावलेला जरी नसला, तरी ऑक्सिजन पुरवठ्यामुळे ग्राफ्स दाखवतो. पण त्याचा चुकीचा अर्थ काढून नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर त्यांनी मृत्यू कसा झाला हे नातेवाईकांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरच रुग्णाचा व्हेंटिलेटर काढण्यात आल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

काय आहे व्हिडिओमध्ये?
एका रुग्णाचे नातेवाईक महिला डॉक्टरशी अर्वाच्च्य भाषेत बोलत असून त्यांना शिवीगाळ करत आहेत. तसेच रुग्णाचे व्हेंटिलेटर पुन्हा सुरू करण्यास डॉक्टरला भाग पाडले. त्यानंतर वारंवार रुग्णाच्या छातीला हात लावून त्याच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचा दावा करत आहेत. काही दृश्यांमध्ये ते थेट डॉक्टरांवर चालून गेल्याचे आणि पोलिसांना ढकलत असल्याचे देखील दिसत आहे.

मार्डकडून आरोपाचा निषेध
जिवंत माणसाला मृत घोषित केल्याचा प्रकार केईएम हॉस्पिटलमध्ये घडला असून याविषयी नातेवाईकांनी संताप व्यक्त करत व्हिडिओ व्हायरल केला. अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून केईएम हॉस्पिटलची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाराविषयी केईएम मार्डकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सायन हॉस्पिटलमधील एका बेडवर दोन रुग्ण ठेवल्याचा व्हिडिओ, त्यानंतर राजावाडीमधील मृतदेहांचा व्हिडिओ झाला होता. असे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे डॉक्टर व हॉस्पिटलच्या प्रतिमेस धक्का पोहोचत आहे. रुग्णांचा हॉस्पिटलवरील विश्वासाला तडा जाऊन सर्वसामान्य व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे यांनी सांगितले.