घरमुंबईएसटी महामंडळाच्या भरतीच्या अटी शिथिल

एसटी महामंडळाच्या भरतीच्या अटी शिथिल

Subscribe

महिला उमेदवारांना होणार फायदा

एसटी महामंडळामार्फत सध्या चालक आणि वाहक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना खूशखूबर आहे. या भरतीमध्ये आता हलके वाहन चालविण्याचा १ वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधीत महिला उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. याबरोबरच महिला उमेदवारांना शारीरिक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली असून ही अट किमान १६० सेंमीवरुन किमान १५३ सेंमी करण्यात आली आहे. तसेच पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट शिथील करण्यात आली असून ३ वर्षाऐवजी १ वर्षाचा अनुभव असलेले पुरुष उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

महामंडळामार्फत राज्यात सध्या ८ हजार २२ इतक्या चालक आणि वाहन पदाची भरती सुरू आहे. यापैकी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ३ हजार ६०६ इतकी पदे भरली जाणार आहेत. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या नियोजनानुसार अर्ज करण्याची मुदत ८ फेब्रुवारी रोजी संपणार होती. इतर जिल्ह्यांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या पदांसाठी २४ फेब्रुवारी रोजी संबंधीत जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे.

- Advertisement -
नारीशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न

परिक्षेअंती ज्या महिलांची निवड होईल त्यांना महामंडळामार्फत १ वर्षाचे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधीत त्यांना महामंडळामार्फत विद्यावेतनही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रितसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील, असे रावते यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -