घरमुंबईमाजी विद्यार्थ्यांचा आर. एम. भट शाळेला नवा साज

माजी विद्यार्थ्यांचा आर. एम. भट शाळेला नवा साज

Subscribe

तुटलेली बाके, रंग उडालेल्या भिंती, पंख्यांची दुरवस्था आणि कुबट वास या अशा वातावरणात परळ येथील आर.एम.भट.हायस्कूल शाळेचा श्वास गुदमरला होता. शाळेची ही दुरवस्था माजी विद्यार्थ्यांना बेचैन करुन सोडत होती.

तुटलेली बाके, रंग उडालेल्या भिंती, पंख्यांची दुरवस्था आणि कुबट वास या अशा वातावरणात परळ येथील आर.एम.भट.हायस्कूल शाळेचा श्वास गुदमरला होता. शाळेची ही दुरवस्था माजी विद्यार्थ्यांना बेचैन करुन सोडत होती. अनेक प्रयत्न केले, पण शाळेची अवस्था काही सुधारत नव्हती. मग माजी विद्यार्थ्यांनीच एकत्र येऊन शाळा सुधारण्याचा संकल्प सोडला आणि तो तडीसही नेला. हायटेक क्लासरुम बनवून शाळेला नवसंजीवनी दिली. १९४७ पासून या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी यासाठी मदतीचे हात पुढे केले. त्यातून महापालिकेला लाजवेल अशी शाळा निर्माण केली.

मुंबईत मराठी शाळांची होत असलेली वाताहत हा गंभीर चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील एक परळ येथील आर.एम.भट ही शाळा होती. मात्र शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची एक फळी शाळेसाठी धावून आली. शाळेचा पूर्णत: कायापालट करत शाळेला नवा साज देण्यात आला. या आधारे माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी इतर शाळांमधील माजी विद्यार्थ्यांना आदर्श घालून दिला आहे. शाळेचा कायापालट करताना आवश्यक असलेला निधी माजी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खिशातूनच जमा केला. पहिल्या फेरीत सुमारे ८० लाखांचा निधी जमवला. या निधीतून शाळेत ई-लर्निंग , नव्या तंत्रज्ञानावर आधारित वर्ग सुरु झाले आहेत. याशिवाय शाळेत प्रोजेक्टर, नवे पंखे, लाईट, रंगरंगोटी, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही या सारख्या अनेक गोष्टी उपलब्ध करून देत शाळेला नवे रूप देण्यात आले आहे. या शाळेत १७०० हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण तयार केले आहे.

- Advertisement -

यंदा शाळेचे शतक महोत्सवी वर्ष असून येत्या २ सप्टेंबरला ‘पुन्हा एकदा शतायुषी शाळेत’ याचे आयोजन करण्यात आले आहे. यात हजारो माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जमणार आहेत. पुन्हा त्यांची शाळा भरणार आहे. यात पहिली बेल, प्रार्थना, आजी-माजी शिक्षकांशी संवाद, गाणं, धमाल मस्ती पुन्हा रंगणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात दखलपात्र कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा ‘आरएम भट रत्न’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी बजावलेली ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. मुंंबईत बंद पडत असलेल्या मराठी शाळांपुढे त्यांनी नवा आदर्श उभा केला आहे.

२०१५ साली जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एक स्वप्न पाहिले होते. आमची शाळा इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये ताकदीने उतरू शकेल, अशी बनवण्याचा ध्यास घेतला. आज आम्ही सगळे शाळेचे बदललेले रूप पाहून खूप समाधानी आहोत. येत्या २ सप्टेंबरला आमच्या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. याद्वारे आमच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे. शाळेचे ३० वर्ग डिजिटलाईज झाले आहेत. शाळेत सगळ्या प्रकारच्या अत्यावश्यक सोयीसुविधांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे.
– संजय खानविलकर, माजी विद्यार्थी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -