प्रभादेवी ते माहिमदरम्यान ८ चौकांचा कायापालट

३४ कोटींची तरतूद

Mumbai
Chowk Renovation

मुंबईतील अनेक चौकांमधील रस्त्यांचा भाग खराब झाल्यामुळे निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने सर्वच चौकांची मास्टिक अस्फाल्टच्या माध्यमातून डागडुजी करण्यात येत आहे. त्यानुसार वरळी ते माहिममधील ८ चौकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या चौकांच्या नूतनीकरणासाठी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

चौकांची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार दुरुस्ती
मुंबईतील काही चौकांची आंतरराष्ट्रीय दर्जानुसार सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, महापालिकेने वांद्रे येथील एच.पी. व वडाळा येथील चौकांची सुधारणा केली आहे, तसेच ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील चौकांची सुधारणा करण्यासाठी अर्बन प्लानिंग स्टॅण्डर्स आणि इंडियन रोड काँग्रेस यांच्या शिफारशीनुसार रि-डिझाईनिंगचे काम मेसर्स ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रोफीस यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याप्रमाणे नागपाडा चौकांसाठीही ५ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. याचे काम प्रगतीपथावर आहे. याच वर्षामध्ये ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रोफीस यांच्या मदतीने १९ चौकांची सुधारणा करण्याचे काम हाती घेत असून, याचेही काम प्रगतीपथावर असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील अनेक चौकांमध्ये पेव्हरब्लॉक बसवण्यात आल्यामुळे तसेच युटीलिटीज टाकण्यासाठी खोदकाम केल्यामुळे चौकांचा परिसर खराब झाला आहे. परिणामी याठिकाणी असलेल्या खडड्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे महापालिकेच्या जी-दक्षिण व जी-उत्तर विभागातील आठ चौकांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकांचे काम करताना पावसाळी पाणी वाहून नेणार्‍या वाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या आदी सेवांच्या कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी ग्यान कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. यावर ३३ कोटी ९६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

हे चौक होणार चकाचक
*जी/दक्षिण विभाग
*एन.एम. जोशी व एस.एल. मटकर चौक
*एन.एम. जोशी मार्ग आणि जगन्नाथ भातणकर मार्ग चौक

जी/उत्तर विभाग
*गोखले रोड व व्ही.एस. मटकर मार्ग चौक
*माहिम दर्ग्यासमोरील एस.व्ही.एस. रोड व एल.जे. क्रॉस रोड क्रमांक २
*सेनापती बापट मार्ग व एम.एम.सी रोड (माहिम रेल्वे स्टेशन)
*एस.व्ही.एस.रोड व केळुस्कर नॉर्थ बाउंड चौक
*एस.व्ही.एस.रोड व एम.बी. राऊत नॉर्थ बाऊंड चौक
*प्रा. एम.एम.पिंगे चौक