दादरच्या टिळक पुलासह शहरातील १६ पुलांची मलमपट्टी

दादरच्या टिळक पुलासह एलफिन्स्टन पूल, करीरोड, चिंचपोकळी, ग्रँटरोड पूलांवर मास्टिक अस्फाल्टचा थर चढवण्यात येणार आहे.

Mumbai
BMC
मुंबई महापालिका

मुंबईतील अंधेरी उड्डाणपुलावरील पादचारी भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरील सर्व पुलांचा सर्वे करण्यात आला. आयआयटी मुंबईच्यावतीने करण्यात आलेल्या मुंबईतील रेल्वे हद्दीतील पुलांची डागडुजी टप्प्या टप्प्याने केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर शहर भागातील एकूण १६ रेल्वे पुलांची डागडुजी करण्यात येणार आहे. यामध्ये दादरच्या टिळक पुलासह एलफिन्स्टन पूल, करीरोड, चिंचपोकळी, ग्रँटरोड आदी पुलांचा समावेश असून या पुलांवरील पृष्ठभागाची मास्टिक अस्फाल्टने मलमपट्टी केली जाणार आहे.

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कामाला सुरुवात

मुंबई शहरातील पश्चिम व मध्य रेल्वेवरील जुन्या पुलांचे ‘आयआयटी मुंबई’च्या माध्यमातून स्थितीदर्शक सर्वे रेल्वेच्यावतीने करण्यात आला होता. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहर भागातील रेल्वे पुलांवरील मार्गिकेचा थर पूर्णपणे काढून अर्थात स्क्रॅपिंग करून त्यावर मास्टिक अस्फाल्टचे थर चढवत पुलाच्या स्लॅबवरील भार कमी करण्याची शिफारस आयआयटीने केली होती. त्यानुसार महापालिकेने यासाठी परिमंडळ एक मधील ८ पूल आणि परिमंडळ दोनमधील ८ पूल अशाप्रकारे एकूण १६ पुलांच्या कामांसाठी स्वतंत्र निविदा काढली होती. यासाठी दोन्ही स्वतंत्र निविदांमध्ये शाह आणि पारीख ही कंपनी पात्र ठरली आहे. यासाठी अनुक्रमे ५.९० कोटी व ८.५० कोटी याप्रमाणे एकूण १४ कोटी ४० कोटी रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात येत आहे. पावसाळा धरुन येत्या ९ महिन्यांमध्ये या कंपनीला या सर्व १६ पुलांच्या डागडुजीचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आयआयटीच्या अहवालानुसार रेल्वेपुलांवरील केवळ पृष्ठभागाची डागडुजी केली जाणार आहे. अनेक पुलांवरील भाग खराब होऊन खड्डे सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. मात्र, स्थायी समितीच्या मान्यतेनंतर याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

हेही वाचा – सहायक आयुक्तपदी चक्रपाणी अल्ले यांची शिफारस

या पुलांची होणार डागडुजी

डी विभाग – बेलासीस रेल्वे पूल, डायना रेल्वे पूल, फ्रेंच पूल,  ग्रँटरोड पूल, केनेडी पूल, सॅण्डहर्स्ट पूल
ई विभाग – भायखळा रेल्वे पूल
सी विभाग – प्रीन्सेस स्ट्रीट पूल
जी- दक्षिण विभाग – महालक्ष्मी रेल्वे पूल
एफ व जी -दक्षिण विभाग – प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील कॅरोल पूल(एलफिन्सटन), चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या उत्तरेकडील पूल
करीरोड स्टेशनच्या उत्तरेकडील रेल्वे पूल
एफ-उत्तर – वडाळाला रेल्वे स्टेशन जवळील नाना फडणवीस पूल, जीटीबी नगर रेल्वे पूल
जी- उत्तर विभाग – माटुंगा पश्चिम रेल्वेजवळील टी.एच.कटारिया पूल
एफ व जी उत्तर विभाग – दादरच्या मध्य व पश्चिम रेल्वेवरील टिळक पूल