घरमुंबईकॅन्सरच्या औषधांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी संशोधन

कॅन्सरच्या औषधांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी संशोधन

Subscribe

आयआयटी मुंबईतील संशोधकांचे प्रयत्न

कॅन्सरसारख्या रोगावर उपचार करताना त्याच्या औषधांचे अनेक दुष्परिणाम हे रुग्णांवर पाहायला मिळतात. औषधांच्या होणार्‍या दुष्परिणामांमुळे रुग्णांना उपचार नकोसे वाटतात. कोणत्याही दुष्पपरिणामाशिवाय सध्यातरी कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार शक्य नसले तरी आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी यावर तोडगा शोधण्यासाठी कंबर कसली आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांकडून सध्या शरीरातील अन्य पेशींना कमीतकमी धक्का पोहचून फक्त कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यावर संशोधन सुरू आहे. यातील प्राथमिक स्तरावरील संशोधन पूर्ण झाले असून त्याच्या गृहितकांवर संशोधन सुरू असल्याची माहिती आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी दिली.

कॅन्सरच्या रुग्णावरील उपचारादरम्यान त्याच्या शरीरावर औषधांचा भडिमार होत असतो. यामध्ये कॅन्सर पेशींबरोबरच शरीरातील अन्य पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच रुग्णावर होत असलेल्या औषधांच्या भडीमारामुळे त्यांना प्रंचड त्रास सहन करावा लागतो. तसेच एखाद्या रुग्णाला दिलेले औषध हे फार काळ त्याच्या शरीरात राहत नाही. त्यामुळे त्याचा फार थोडावेळच परिणाम होत असतो. ही बाब लक्षात घेऊन आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी प्रथिनांवर आधारित उपचार पद्धतीवर संशोधन सुरू केले आहे. यामध्ये रुग्णाला देण्यात येणारे औषध हे जेलीच्या माध्यमातून इंजेक्शनद्वारे देण्यात येते. साधारणपणे जेलवर दबाव पडल्यास तिचे पाण्यात रुपांतर होते. पण आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी बनवलेली बोविन सेरम अल्ब्युमिन (बीएसए) ही जेली इंजेक्शनद्वारे रुग्णाला दिल्यानंतरही तिचे पाण्यात रुपांतर होत नाही.

- Advertisement -

प्रथिनांवर आधारित असलेल्या पद्धतीमध्ये जेलीच्या माध्यमातून कॅन्सरचे औषध दिल्यानंतर ते पुढील 24 तासांत हळूहळू रुग्णांच्या शरीरात पसरते. त्यामुळे जेलीच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या औषधाचा परिणाम बराच काळ रुग्णांच्या शरीरामध्ये टिकून राहतो. तसेच त्याचा एकाच वेळी औषधाचा भडीमार रुग्णाच्या शरीरावर होत नसल्याने शरीरातील अन्य महत्त्वाच्या पेशींवर त्याचा परिणाम होत नाही आणि कॅन्सरच्या शरीरातील जवळपास 70 ते 80 पेशी नष्ट होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. यातून जेलीमुळे शरीरातील कॅन्सरव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पेशी मारल्या जात नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाल्याने कॅन्सर रुग्णांसाठी ही जेली एकप्रकारे वरदान ठरू शकते, असे आयआयटी मुंबईतील संशोधक प्रो. चेब्रोलू पुला राव यांनी सांगितले. हे संशोधन एसीएस सस्टेनेबल केमिस्ट्री अ‍ॅण्ड इंजिनियरींगमध्ये प्रकाशित झाले आहे.

जेलीचे प्राथमिक स्तरावरील संशोधनाला यश मिळाले असले तरी अद्याप भरपूर संशोधन शिल्लक आहे. त्यामुळे ही जेली सध्यातरी उपचारासाठी वापरता येणार नाही. जेलीचा वापर प्राण्यांवर करण्याचे अद्याप बाकी आहे. त्याच्या प्रक्रियेला आम्ही लवकरच सुरुवात करू. प्राण्यांवरील संशोधनाला यश आल्यास तिचा वापराला महत्त्व येईल, असेही प्रो. राव यांच्या सहकारी अकेता उपाध्याय यांनी सांगितले.

- Advertisement -

कॅन्सर रुग्णांवर औषधांच्या होणार्‍या दुष्परिणामावर मात करण्यास जेलीसंदर्भातील संशोधनामुळे नवीन आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे ही जेलीचे पेंटट घेण्यात आले नाही. अन्य कोणत्याही संशोधकाला याबाबत अधिक संशोधन करायचे असल्याचे त्याला जेलीचा वापर करू शकतो.
– प्रो. चेब्रोलू पुला राव, संशोधक, आयआयटी मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -