घरमुंबईभाजपच्या इशार्‍याने शिवसेनेत संताप

भाजपच्या इशार्‍याने शिवसेनेत संताप

Subscribe

मुख्यमंत्री ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप

प्रतिनिधी:-शिरूर आणि मावळ या शिवसेनेकडील लोकसभेच्या दोन मतदारसंघांत भाजपने अटल महासंमेलनाच्या माध्यमातून शिवसेनेला अस्तित्वाची जाणीव करून देताना, ‘..अन्यथा आपले उमेदवार निवडून आणू’, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या इशार्‍याने शिवसेनेत संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मावळ आणि शिरूर मतदारसंघांतील पक्ष पदाधिकार्‍यांशी तातडीने चर्चा केली. भाजपच्या इशार्‍यापुढे कुठल्याही परिस्थितीत नमते घ्यायचे नाही, मुख्यमंत्र्यांची ही खेळी म्हणजे पक्षाला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे, असे या पदाधिकार्‍यांनी उध्दव ठाकरेंना सांगिले, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकार्‍याने या प्रतिनिधीशी बोलताना दिली.भाजप-शिवसेनेतील वाढत्या दरीमुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या मतदारसंघांमध्ये शक्तीप्रदर्शन करत आहेत.

गेल्या आठवड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून सुरू केलेल्या राज्यातील दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपने सेनेच्या शिरूर आणि मावळ या मतदारसंघांमध्ये अटल महासंमेलनाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले. पुण्यापासून अगदी उरणपर्यंत हजारो वाहनांच्या मदतीने या मेळाव्यासाठी २० हजार लोकांची जमवाजमव करण्यात आली होती. शिरूर आणि मावळ या मतदारसंघांमध्ये युतीच्या ताकदीवर सेनेचे खासदार निवडून आले होते. हे लक्षात घेऊन भाजपने हा मेळावा घेत एकार्थी सेनेला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट आहे. केवळ शक्ती दाखवून भाजप नेते थांबले नाहीत. त्यांनी विरोधकांबरोबरच शिवसेनेलाही गर्भित इशारा देऊन टाकला.
मोदींच्या विजयासाठी सहकारी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देऊ, असे सांगताना युती न झाल्यास आम्ही तयार आहोत. आमच्या उमेदवारांना निवडून आणू, असा इशारा देत आमचीही तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सेनेला बजावले आहे. भाजपच्या या तयारीने आणि मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍याने सेनेत चिंता वाढली आहे.

- Advertisement -

विशेषत: निवडणुका आणखी काही महिन्यांवर असताना विविध वाहिन्यांद्वारे सर्वेक्षण केल्याचे भासवायचे आणि दुसरीकडे इशारे देत सेनेला चेकमेट करायचे हा नवा प्रयोग भाजपने सुरू केला आहे. भाजप नेत्यांना कुठल्याही परिस्थितीत सेनेबरोबर युती हवी आहे, यासाठी कुठल्याही थराला जाण्याची भाजपची तयारी असल्याचा आरोप सेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी चर्चेदरम्यान केला. अटल महासंमेलनात इशारा देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांपूर्वीच युती न झाल्यास एकत्र निवडणूक घेण्याचा इशारा सेनेला दिला होता. आता आपले उमेदवार निवडून आणण्याचा इशारा देत मुख्यमंत्री शिवसेनेला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सेनेच्या मावळ आणि शिरूरमधील पदाधिकार्‍यांनी केला आहे. एकीकडे इशारा द्यायचा आणि दुसरीकडे ही राजकीय सभा नाही, असे सांगण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्यांचा कुटिल डाव आहे, असा आरोप सेनेचे नेते दिनेश पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -