गाव सुकलाय, मुंबईत पाणीच पाणी!

दुष्काळग्रस्त भागातील भीम अनुयायींच्या प्रतिक्रिया

Mumbai
Response from Babasaheb Ambedkar followers in drought-affected areas says
Yashodabai

पाण्याच्या टाकीत नळ्या टाकून तोंडाने पाणी ओढायचे आणि दिवसाआड मिळणारे प्यायचे पाणी भरायचे. दिवसदिवस पाण्यासाठी काढायचा हा आता गावातील महिलांचा नित्यक्रम बनला आहे. शेतातील मका जळून गेला, घरबंद करून अनेक लोक गावाबाहेर पडले आहेत, असा अनुभव सांगत होत्या जालना जिल्ह्यातील भोकरदण तालुक्यातून आलेल्या पंचफुला मगरे. गेल्या सहा वर्षांपासून त्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुंबईत चैत्यभूमीवर अभिवादनाला येतात. गेल्या तीन वर्षांपासूनच आमच्या भागाला दुष्काळाने पीडले आहे. गाव सगळा सुकलाय, मुंबईत मात्र पाणीच पाणी दिसते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

पिण्याच्या पाण्यासाठीची लढाई एकीकडे मोठी आहे, पण पाण्याअभावी शेती जळणारी पाहवत नाही. घरोघरी नळयोजनेतून पाण्याच्या जोडणीचे पाईप पोहचले आहेत, पण पिण्यासाठी त्यातून एकदाही पाणी आलेले नाही. दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते, तेदेखील खूप अस्वच्छ असते. गाळून पिण्याशिवाय पर्याय नसतो. माझे वय झाले आहे, आता कामासाठी कुठेही जाता येत नाही. पण कुटुंबात छोटी मुले असणार्‍यांचा काम केल्याशिवाय खर्च कसा भागणार? म्हणूनच दरवर्षी अनेक जण घर बंद करून गाव सोडून पुणे, औरंगाबाद याठिकाणी जातात, असेही त्यांनी सांगितले. भीमा कोरेगावच्या हिंसेमध्ये मीदेखील माझ्या कुटुंबासह अडकले होते. रस्त्यात अनेक ठिकाणी दगडफेकीच्या प्रसंगांना सामना करावा लागला. तरीही जवळपास सात ते आठ तास सलग चालत मी कुटुंबासह तिथून बाहेर पडले. आज मुंबईत येण्याआधीही अनेकांनी भीमा कोरेगावसारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली. पण या घटनेला न घाबरता घडेल त्या प्रसंगाला सामोरे जायचे यासाठी मी तयार झाले, असेही त्या म्हणाल्या. यंदा पहिल्याच वर्षी त्यांच्यासोबत लिलाबाई मगरेदेखील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आल्या होत्या. त्यांनीदेखील मुंबईतील गर्दी आणि वाहनांचे ट्रॅफिक हे सगळ आश्चर्याच वाटते, अशी भावना व्यक्त केली.

आम्ही खेड्यात राहतो, ज्या तालुक्याच्या ठिकाणी कामाला जातो त्याठिकाणी रंगारी काम करून पोट भरतो. पण ग्रामीण भागात राहूनही आम्ही पाण्यासाठी महिन्याला 300 रूपये भरतो. यंदा पाण्याच्या भीषण टंचाईला डिसेंबर महिन्यातच सुरूवात झाली आहे. यंदा उन्हाळ्यात पाण्याचे संकट आणखी भीषण होणार आहे, असे हिंगोली जिल्ह्यातील वस्मत तालुक्यातील देविदास मोरे खूपच गंभीरपणे सांगत होते. गावातली नळयोजना बिल न भरल्यामुळे बंद झाली आहे. दोन बोर गावकर्‍यांनी मिळून घेतल्या. 500 फूट अंतरावरून पाईपलाईनने पाणी गावात येते. हे पाणीही दोन दिवसाआड येते. पण या पाण्यासाठी 300 रूपये मोजावे लागतात. शहरातील लोकांपेक्षाही हा पाण्याचा खर्च अधिक आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत पाणी संकटाने सातत्याने हिंगोली जिल्ह्यात तोंड वर काढले आहे. त्यामुळे यंदाही डिसेंबर अखेरीस पुरेल इतकेच पाणी आहे. यंदा जानेवारीतच टँकर सुरू करावा लागेल अशी स्थिती आहे.

दुष्काळग्रस्त भागातील भीम अनुयायींचा प्रतिक्रिया

जळगावातील रावेरमध्ये दर दोन दिवसाआड पाणी येते. प्रत्येकाला साधारणपणे एका तासात हे पाणी भरावे लागते. एका तासात मोजून 5 हंडे इतके पाणी मिळते. कपडे आणि भांड्यासाठी इतर पाण्याची व्यवस्थाही करावी लागते. या पाण्यासाठी महिन्याला 1200 रूपये ते 1300 रूपये मोजावे लागतात. शेतीला तर काहीच पाणी उरत नाही, अशी खंत यशोदाबाई लघासे यांनी व्यक्त केली. यंदा मुंबईत पहिल्यांदाच चैत्यभूमीवर अभिवादनासाठी आले आहे. मुंबई शहरातील लगबग सगळी भारावणारी आहे. मुंबईचा समुद्र पाहिला आता आणखी मुंबई फिरायची आहे, असेही त्या म्हणाल्या.

यशोदाबाई लघासे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here