केडीएमसीवर १६३ कोटींचा वाढीव बोजा?

Kalyan Dombivli Municipal Corporation
कल्‍याण-डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सन २०१९-२० च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्न १०८ कोटी रुपयांनी घसरण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचवेळी महसुली खर्चामध्ये १७ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच बांधिल खर्च, मनपाचे स्वतःचे भांडवल, स्पील ओव्हर आणि सातव्या वेतनाची रक्कम या सर्वांचा विचार करता महापालिकेच्या तिजोरीवर १६३ कोटींचा वाढीव महसुली खर्चाचा बोजा पडणार असल्याची माहिती महापालिकेतील एका बड्या अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ शी बोलताना दिली. या सर्वांचा विचार करता भविष्यात पालिकेला मोठ्या आर्थिक कसरतीला सामोरे जावे लागणार आहे.

महापालिका आयुक्तांनी मूळ अंदाजपत्रकामध्ये १०३४ कोटींचा महसुली उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला होता. प्रशासनाकडून सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून लवकरच ते मांडण्यात येणार आहे. सुधारीत अर्थसंकल्पात ९२६ केाटी ६२ लाखांचे महसुली उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महसुली खर्चाबाबतचे मूळ अंदाजपत्रक ८०९ कोटींवरून ८२६ कोटी ५२ लाखांवर जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. १७ कोटींच्या महसुली खर्चाच्या वाढीचे संकेतही प्रशासनाचे आहेत. शासनाकडून ४६८ कोटी ३५ लाखांचे कर्ज मिळाले असून, ३१ मार्च २०२० अखेर २७२ कोटी २२ लाखांचे कर्जफेड होणे बाकी आहे.

महापालिकेला शासनाकडून ४ प्रकल्पासाठी ३८४ कोटी ६४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. महापालिकेला विकास प्रकल्पासाठी स्वभांडवल म्हणून उभारावयाच्या २३० कोटी रकमेपैकी १०८ कोटीच्या निधी त्या त्या प्रकल्पाकडे वर्ग केला असून १०३ कोटींचा निधी अद्याप उभारणे बाकी आहे. त्यामुळे कर्जफेडीसाठी ६६ कोटी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली आहे. २०२०-२१ जमा खर्चाचे अंदाज पाहता महसुली जमा १०३६ कोटी ६२ लाखांची असून, बांधिल खर्च ८२६ कोटी ५२ लाख, मनपा स्वभांडवल १३० कोटी ३८ लाख, स्पील ओव्हरसाठी खर्च १६० कोटी, कालबध्द पदोन्नती पेाटी ३ कोटी आणि सातव्या वेतन आयेागापोटी ८० कोटींची तरतूद पाहता ११९९ केाटी ९० लाखांच्या खर्चाचा अंदाज प्रशासनाचा असल्याने १६३ कोटी २८ लाखांचा वाढीव खर्चाचा बोझा महापालिकेवर पडणार आहे. प्रशासकीय खर्च ४२.३३ टक्यांवर जाणार असून मर्यादेपेक्षा अधिक असणार आहे.