रो-रो सेवा अखेर मुहूर्त मिळाला

सप्टेंबरपासून मुंबईत सुरू होणार सेवा

Mumbai

बहुचर्चित रो-रो सेवेचा न्यायालयीन तिढा सुटल्याने येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस एक अत्याधुनिक रो-रो बोट मुंबईत दाखल होणार आहे. त्यासाठी नव्या कंपनी बरोबर सागरी महामंडळाचा करारसुध्दा झाला आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आपल्या कार, मोटर सायकलसह रो-रो बोटीतून प्रवास करता येणार आहे.

सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्‍यांचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यामाध्यमातून मुंबईत रो-रो सेवा सुरु होणार होती. त्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. भाऊचा धक्का, मांडवा, नवी मुंबईतील नेरुळ या त्रिकोणात रो-रा सेवा (प्रवासी व वाहनांची वाहतूक) सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प सप्टेंबर 2018 मध्येही सुरू होणार होता. रो-रो बोटी चालविण्यासाठी एका कंपनीशी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाबरोबर करार झाला होता. मात्र बोर्डाकडून दिलेल्या वेळेत कंपनी रो-रो बोटी आणू न शकल्याने करार रद्द झाला आहे. त्यांनतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे नवीन निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र कंपनीने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. कोर्टाने रो-रो सेवेच्या निविदांना स्थगिती दिली. मात्र हा खटला कोर्टाने रद्द केल्यामुळे आता रखडलेल्या रो-रो सेवेला आता चालना मिळाली आहे. भाऊचा धक्का ते मांडवा या दरम्यान रो-रो बोटी चालविण्याकरिता इस्कॉयर शिपिंग प्रा.लि. या कंपनीला कंत्राट देण्यात आलेला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत एक बोट मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर रो-रो बोटीची चाचणी घेऊन रो-रो सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

नेरुळमधूनही रोरो सेवेला होणार उशीर
भाऊचा धक्का ते मांडवा आणि नवी मुंबईतील नेरुळ या जलमार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा मानस सागरी महामंडळाच्या होता. मात्र नेरूळ येथे या सेवेसाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तूर्तास नेरुळ येथून फक्त प्रवासी वाहतूक होणार आहे. या ठिकाणची खाडी उथळ असल्याने मोठ्या आकाराचे जहाज किनार्‍याला लागू शकत नाही. त्यासाठी खाडीचा तळ आणखी मोठा करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यानंतरच नेरुळमधूनही रो-रो सेवा सुरू होईल.

रो-रोमुळे बारमाही प्रवास होणार शक्य
या प्रकल्पाला अंदाजित १३५ कोटी रूपये खर्च येणार होता. यामध्ये आतापर्यंत ७२ कोटी रूपये खर्चून ब्रेक वॉटर उभारण्यात आला आहे. तर जेटीच्या कामावर ६३ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. जेटीमध्ये टनग प्लॅटफॉर्म, अ‍ॅप्रोच जेटी, टर्मिनल वाहनतळ आणि लिंकस्पॅपन यांचा समावेश आहे. मात्र या प्रक्लपाला उशीर झाल्यामुळे या प्रकल्पाची किमंत 200 कोटींच्या वर जाणार आहे. सध्या मुंबई ते मांडवा या फेरीबोट सेवेचा हजारो प्रवासी लाभ घेतात. रो- रो सेवेमुळे बारमाही महिने प्रवासी आणि वाहनांची वाहतूक शक्य होणार आहे.

रो-रो सेवा संबधित खटला सुरू होता. मात्र आता कोर्टाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता रो-रो बोटीसाठी इस्कॉयर शिपिंग प्रा.लि. या कंपनीला आमचा करार झाला आहेत. या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी बोटी मुंबईत दाखल होणार आहेत.
-कॅप्टन हरीश खत्री, नौकानयन सल्लागार, महाराष्ट्र मरीटाईम बोर्ड