अटाळीतील रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून बंद

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी कल्याण पश्चिमेचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी अटाळी गावातील भोईर कंपाऊंड ते काळू नदीपर्यंत शंभर मीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ केला होता. 20 लाखांच्या आमदार निधीतील काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडल्याने नागरिकांना खडी टाकून ठेवलेल्या रस्त्यावरून अडखळत चालावे लागत असल्याने गावकर्‍यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

काँक्रिटीकरण असणार्‍या या रस्त्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाणी पुरवण्याची लाईन असून तर विद्युत महावितरण कंपनीची केबल देखील गेल्याने संबंधित ठेकेदाराने संबंधित विभागांकडे परवानगी घेतलेली नाही.गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून नागरिकांना चालणे अवघड होऊन बसले आहे. त्यातच दगडांची सोलिंग तसेच पीसीसी ही केलेली नाहीत. या रस्त्यांवरून दररोज हजारो नागरिक प्रवास करीत आहेत. नांदकर व अन्य बाजूच्या गावातील लोक नदीकिनार्‍यावर होडी मार्गे जात असतात. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड खडी टाकल्याने आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना चालणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रस्त्यांच्या ज्या ठिकाणाहून पाणी पुरवण्याची लाईन गेली असून तसेच महावितरण कंपनीचे केबल गेली असून अशा ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून उर्वरित रस्ता काँक्रिटीकरण केला जाणार असल्याचे कडोंमपाचे बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील वैद्य यांनी सांगितले. रस्ता काँक्रिटीकरणाच काम घेणार्‍या ठेकेदाराने पाणीपुरवठा व महावितरण कंपनीकडे कुठलीच सूचना न दिल्याने या रस्त्याचे काम रखडले असल्याचे येथील स्थानिक मनसेचे पदाधिकारी दिनेश पाटील यांनी म्हटले आहे.

अर्धा रस्ता पेव्हर ब्लॉकचा
पाण्याची लाईन व विद्युत महावितरण यांची केबल शिफ्ट केल्यास संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण होऊ शकतो. मात्र बांधकाम विभागाचे याकडे कानाडोळा करीत असल्याने अर्धा रस्ता पेवर ब्लॉकचा तर अर्धा रस्ता डांबरीकरणाचा करणार असल्याने पेव्हर ब्लॉकचा रस्ता टिकेल का? याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.