घरमुंबईप्लास्टिकपासून रस्ते, विटा

प्लास्टिकपासून रस्ते, विटा

Subscribe

जोगेश्वरीच्या कन्येचे संशोधन

प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण हे सार्‍यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी व त्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने जोगेश्वरीतील अरविंद गंडभीर या मराठी शाळेतील गुंजन सागवेकर या विद्यार्थिनीने प्लास्टिकच्या पुनर्वापरासंदर्भातील प्रकल्प तयार केला आहे. प्लास्टिकचा तुलनात्मक अभ्यास करून त्यापासून विटा, रस्ता यांसह कोणत्या वस्तू बनवता येतील, यावर तिने संशोधन केले. गुंजनच्या या संशोधनाची निवड राष्ट्रीय बाल विज्ञान संशोधन परिषदेमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतून या परिषदेमध्ये सहभागी होणार्‍या आठ शाळांपैकी अरविंद गंडभीर ही एकमेव मराठी शाळा ठरली आहे.

आज प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. परंतु वापरानंतर फेकून देण्यात येणार्‍या प्लास्टिकच्या कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे प्रदूषण माणसालाच नव्हे तर पक्षी, प्राणी व नदी, समुद्रातील जलचर प्राण्यांसाठीही जीवघेणे ठरत आहे. प्लास्टिकचा राक्षस जगासमोर आ वासून उभा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा प्लास्टिकचा कचर्‍याचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होईल, या विचाराने जोगेश्वरीतील अरविंद गंडभीर या शाळेतील गुंजन सागवेकर व पूजा दिवेकर या दोन मुलींनी प्लास्टिकच्या पुनर्वापरासंदर्भात अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी टेट्रापॅक आणि प्लास्टिक बाटल्यांचा कल्पक पुनर्वापराचा तुलनात्मक अभ्यास हा प्रकल्प हाती घेतला. शिक्षिका विद्या रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन महिने गुंजन व पूजाने प्लास्टिकच्या पुनर्वापरासंदर्भात अभ्यास करून विटा व रस्ता बनवण्यासंदर्भात सखोल संशोधन केले. प्लास्टिकच्या अभ्यासाची तुलना त्यांनी टेट्रापॅकसोबत केली. जेणेकरून अभ्यासाची दिशा ठरवणे व पडताळणी करणे त्यांना सोपे गेले.

- Advertisement -

या प्रकल्पाचा अभ्यास त्यांनी सात टप्प्यांमध्ये केला. पहिल्या टप्प्यामध्ये प्लास्टिक हे टेट्रापॅकपेक्षा जास्त टिकाऊ असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसर्‍या टप्प्यामध्ये टेट्रापॅक व मातीच्या विटा व पत्रे पाण्यामध्ये विरघळण्याबरोबरच पत्रे गळत असत. पण प्लास्टिकच्या विटा टिकून राहत असल्याचे दिसून आले. प्लास्टिक हे उच्च तापमानामध्ये टिकून राहत असल्याने गुंजनने विटांमध्ये प्लास्टिकचा वापर केला. प्लास्टिक व सिमेंटच्या मिश्रणापासून बनवलेल्या विटा अविघटनशील असल्याने त्या टिकाऊ असल्याचे अभ्यासातून समोर आले. त्यानंतर प्लास्टिकमध्ये खडी व डांबरचे मिश्रण टाकून त्यापासून रस्ता बनवण्यासंदर्भात गुंजनने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. या अभ्यासात प्लास्टिकपासून बनवलेला रस्ता हा अधिक टिकाऊ असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर शक्य असून त्यापासून प्लास्टिकचा कचरा कमी करता येऊ शकतो, हे गुंजनने आपल्या प्रकल्पातून दाखवून दिले.

गुंजनने केलेला अभ्यासपूर्ण प्रकल्प हा समाजाला नजरेसमोर ठेऊन केला आहे. या प्रकल्पामुळे प्लास्टिकच्या कचर्‍यावर तोडगा काढण्यात आला असून, त्यापासून भविष्यात प्लास्टिक प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यातील 73 प्रकल्पांतून महाराष्ट्रातील 30 प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे. यामध्ये मुंबईतील आठ प्रकल्प असून त्यामध्ये गुंजनच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. गुंजनच्या या प्रकल्पामुळे मुंबईतून एकमेव मराठी शाळेतील प्रकल्पाची निवड झाली आहे.

- Advertisement -

गुजनने बनवलेल्या प्लास्टिकच्या विटा ह्या बाजारात मिळणार्‍या विटांच्या तुलनेत तीन पट स्वस्त आहेत. बाजारामध्ये 36 रुपयांना एक विट मिळते. तर प्लास्टिकची विट ही 14 रुपयांमध्ये बनवली जाते. त्याचप्रमाणे प्लास्टिकपासून बनवलेला रस्त्याचा खर्च ही कमी येत असल्याचे गुंजनने सांगितले.

शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद व नेहमीच्या विज्ञान परिषदेत फारच फरक आहे. यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी प्रत्येक विषयावर संशोधन करतात व त्यानंतर त्यांनी काढलेला निष्कर्ष स्पर्धेमध्ये आपल्या प्रकल्पाद्वारे मांडला जातो. हा आपल्या देशातील सर्वात मोठा उपक्रम समजला जातो. या परिषदेमध्ये देशातून दरवर्षी 700 प्रकल्प येतात. त्यातून 15 प्रकल्प निवडले जातात. यातून निवड होणार्‍या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळते. तसेच या विद्यार्थ्यांना भविष्यात फेलोशिपही देण्यात येते, अशी माहिती राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे मुंबई विभागाचे अध्यक्ष बी.बी. जाधव यांनी दिली.

प्लास्टिक हे हानिकारक असते असे म्हटले जाते. पण त्याचा पुनर्वापर केल्यास ते वापरण्यास अधिक योग्य होते. प्लास्टिकपासून होणार्‍या कचर्‍याचा पुनर्वापर केल्यास प्रदूषण टाळता येऊ शकते व अधिक चांगल्या वस्तू बनवता येऊ शकतात. हे दाखवून देण्यासाठीच मी हा प्रकल्प केला आहे. हा प्रकल्प करताना मला भरपूर काही शिकायला मिळाले.
– गुंजन सागवेकर, प्रकल्प प्रमुख, अरविंद गंडभीर हायस्कूल, जोगेश्वरी.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -