चोरीसाठी घरात शिरला आणि शॅम्पेन बघून पीत बसला; नशेत चोरीच विसरला!

शॅम्पेन प्यायल्यामुळे चोरटा नशेत तर्र झाला आणि चोरायचं राहून गेल्याचा अजब प्रकार मुंबईत घडला आहे!

arrest

दारूमुळे नुकसान होतं असं अनेकदा आपण ऐकतो. पण मुंबईच्या एका व्यावसायिकाचं याच दारूमुळे मोठं नुकसान टळल्याची अजब घटना घडली आहे. या व्यावसायिकाच्या घरी शॅम्पेनच्या दोन बाटल्या होत्या. त्या दोन बाटल्यांमुळे त्याच्या घरात चोरीचा प्रयत्न फसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोराला नशेच्या परिस्थितीत अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात संबंधित व्यावसायिक आपल्या नशीबावर भलताच खूश आहे.

कशी थांबली चोरी?

त्याचं झालं असं, की मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये राहणारा व्यावसायिक त्याच्या घरी नसताना त्याच्या घरात एक चोर शिरला. हा व्यावसायिक त्याच इमारतीमधल्या त्याच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये मुक्कामाला होता. चोर त्याच्या फ्लॅटमध्ये शिरल्यावर त्याने किंमती वस्तू, पैसे किंवा दागिन्यांचा शोध घेतला. पण तेवढ्यात त्याच्या नजरेला व्यावसायिकाच्या घरी ठेवलेल्या शॅम्पेनच्या दोन बाटल्या दिसल्या. आता चोर महाशयांनी आधी आपलं काम उरकून नंतर ‘वेगळ्या’ कार्यक्रमाकडे वळणं अपेक्षित होतं. पण या पठ्ठ्याला आयत्या मिळालेल्या शॅम्पेनवर हात मारायचा मोह झाला. त्याला वाटलं, चोरी करायला आलेलोच आहे, तर आधी थोडीशी शॅम्पेन पिऊन घेऊ. झालं, तिथंच घोटाळा झाला!

घरमालकाला काय दिसलं?

एकच प्याला करता करता या महाशयांनी शॅम्पेनच्या दोन्ही बाटल्या रिकाम्या केल्या. पोटात शॅम्पेन आणि डोक्यात नशा चढल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तिथेच सोफ्यावर हातातल्या चाकूसकट हे चोर महाशय आडवे पडले!

सकाळी व्यावसायिकाच्या घरातली मोलकरीण जेव्हा दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागली, तेव्हा तिला कळलं की दरवाजा आतून बंद आहे. मग तिने घरमालकाला बोलावून आणलं. त्याने दरवाजा तोडून जेव्हा आत प्रवेश केला, तेव्हा समोरचं दृश्य अजब होतं. चोर महाशय त्यांच्या विशिष्ट वेशभूषेसकट सोफ्यावर उताणे पडले होते. त्यांच्या बाजूला त्यांचा चाकू पडला होता. आणि समोर शॅम्पेनच्या दोन्ही बाटल्या रिकाम्या दिसत होत्या. हा प्रकार पाहून घरमालकाला सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी या चोराची चौकशी केल्यानंतर चोराने आपण चोरी करण्यासाठी आलो होतो पण शॅम्पेन पिल्यामुळे शुद्ध हरपल्याचं कबुल केलं. अखेर पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.


पाहा व्हिडिओ – अशी तस्करी बघितलीये का? तस्करीसाठी अजब शक्कल!