आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांर्गत (आरटीई) राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

RTE

शिक्षण हक्क कायद्यांर्गत (आरटीई) राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत यासाठी आरटीई प्रवेशाला २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. सोडतीमध्ये राज्यभरातून पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या १ लाख ९२६ विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले होते. तर मुंबईतून ५३७१ विद्यार्थ्यांपैकी ३१३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदा प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेला ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान चालणार होती. मात्र प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा प्रवेश घेण्यासाठी फारच अल्प प्रतिसाद मिळाला. नऊ दिवसांमध्ये प्रतीक्षा यादीत राज्यातून फक्त २३१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर मुंबईतून फक्त ९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. प्रतीक्षा यादीतील प्रवेशालाही अल्प प्रतिसाद मिळत असल्याने आरटीई प्रवेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाचा दिनांक कळवण्यात येत आहे. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी बालकांना सोबत घेऊन जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – एफडीएकडून ३५ लाखांचा पान मसाला जप्त