“…हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो” शिवसेनेचा विरोधकांवर हल्लाबोल

“… हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा अवमान”; शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत आणि शिवसेनेचा सुरू असलेला वाद काही केल्या संपताना दिसत नाही. दरम्यान मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळय़ा वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे. प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते, अशा शब्दांत शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबईवर टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केल्याचे दिसत आहे.

यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान आहे, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर निशाणा साधला आहे. तर  राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? असा सवालही शिवसेनेने केला आहे.

महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुंबईची भूमी येथील भूमिपुत्रांच्या रक्ताने आणि घामाने भिजली आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱया हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱयावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे! असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.


सरकारी आशीर्वादाने खासगी लॅबनी जनतेची २७० कोटींची लूट केली – प्रवीण दरेकर