घरमुंबईअध्यक्षपदाचा राजीनामा न देता सचिन अहिर शिवसेनेत

अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सचिन अहिर शिवसेनेत

Subscribe

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री सचिन अहिर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधून घेतले. अहिर हे सलग सहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. आतापर्यंत त्यांनी चार टर्म म्हणजे १२ वर्षे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे. मात्र शिवसेनेत प्रवेश करतेवेळी त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामाच दिला नसल्याचे समोर आले आहे. ‘आपलं महानगर’ने याबाबत सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधून त्यांना राजीनाम्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘राजीनामा साहेबांकडे दिला आहे,’ त्यावर ‘कोणत्या साहेबांकडे राजीनामा दिला,’ असा प्रतिप्रश्न विचारला असता सचिन अहिर यांनी फोन डिसकनेक्ट केला.

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होते. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून पक्षात होते. अतिशय कमी वयातच त्यांना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये बसण्याचा मान मिळाला होता. सत्तेत असताना त्यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. तसेच शरद पवारांच्या पुण्याईमुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आहेत. २०१४ साली वरळीतून पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर सलग दोन टर्म मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासूनच कमकुवत होण्यामागे सचिन अहिर यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे, असा आरोप होत आहे. यातच मुंबईच्या अध्यक्षानेच राजीनामा न देता पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आहे.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारवाई का नाही केली?
सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवत, ‘सचिन अहिर यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा’, असे सांगत कानावर हात ठेवले. तर जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. अहिर आणि जयंत पाटील यांचे गेले काही वर्षे मुंबईत घनिष्ठ हितसंबंध असल्याची दबकी चर्चा राष्ट्रवादीत कित्येक वर्षांपासून सुरु आहे. राज्यात सत्तेत असताना जयंत पाटील हे १५ वर्षे मुंबईचे पालकमंत्री होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर याच काळात जयंत पाटील यांचे निकटवर्तीय बनले. या जवळीकीमधूनच पाटील यांनी आतापर्यंत अहिर यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचा संशय पक्षातूनच व्यक्त केला जात आहे. अहिर यांच्याठिकाणी दुसर्‍या कोणत्याही नेत्याने जर राजीनामा न देता पक्षांतर केले असते, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असती. मात्र अहिर यांच्याबाबत पक्ष मवाळ का? असा प्रश्न मुंबईतीलच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे.

राजीनाम्यावरुन प्रदेश कार्यालयाचे दिल्लीकडे बोट
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मुंबई प्रांताच्या प्रदेशाध्यक्षाला, राज्याच्या प्रदेशाध्यक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती किंवा हकालपट्टी दिल्लीतून होत असते. त्यामुळेच अहिर यांच्या राजीनाम्याबाबत आता प्रदेश कार्यालय दिल्लीकडे बोट दाखवत आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार देखील दिल्लीलाच असल्याचेही प्रदेश कार्यालयातून सांगण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी, पवारांचा अहिर समर्थकांना सल्ला
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर मुंबईतील विशेष करुन वरळी मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व समर्थकांनी शुक्रवारी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या समर्थकांना धीर देत तुम्ही सर्वजण खंबीर रहा, पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे. परिसरातील जनहिताची कामे सुरु ठेवा, असा सल्ला त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -