आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचे उपोषण; ६ दिवस सरकारचे दुर्लक्ष

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती महामोर्चातर्फे मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये गेल्या ६ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. यामध्ये आता आंदोलकाची प्रकृती खालावली असून सरकार अजूनही दुर्लक्ष करत आहे असा दावा आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

Mumbai
Maratha Kranti Hunger Strike at Azad Maidan
आझाद मैदानवर सकल मराठा क्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती महामोर्चातील ६ समन्वयकांची प्रकृती खालवली असून, या उपोषणाची कोणतीही दखल सरकार घेत नसल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी उपोषणाचा ६ वा दिवस असूनही, समन्वयक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मराठा आरक्षण, सारथी संस्था तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृह जुलै २०१७ पर्यत कार्यान्वित करू असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र याला वर्ष झाले तरी देखील काहीच झाले नाही. त्यामुळे आम्ही आता आमरण उपोषणाला बसल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले. तसेच जोवर सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर हे आंदोलन मागे घेणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

भाऊबिजेच्या निमिताने महिलाही आंदोलनात सहभागी

शुक्रवारी भाऊबीजेच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि गेले ६ दिवस याचसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या महिला आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचे विद्याताई गडाक यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले.

उपोषण दडपण्याचा प्रयत्न

दरम्यान, ‘उपोषणाला बसल्यापासून सरकारकडून कुणी येण्याची तसदीही घेतली नसल्याचे’ सांगत उलट हे आंदोलन पोलिसांचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप या समन्वयकांनी केला. त्यामुळे ‘शेवटच्या श्वासापर्यत आम्ही हा लढा लढू, कारण या फडणवीस सरकारवर अजिबात विश्वास नसल्याचे’ उपोषणकर्त्यांनी सांगितले.


तुम्ही हे वाचलंत का? – पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना


काय आहेत मागण्या?

१) कोपर्डी खटल्यातील आरोपींना सुनावल्या गेलेल्या फाशीच्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी

२) मराठा आरक्षण जाहीर करून लागू करावे

३) मराठा आंदोलकांची धरपकड थांबवावी आणि गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत

४) आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी

५) सारथी संस्थेच्या अध्यक्षपदावरून सदानंद मोरे यांना हटवून त्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच आयुक्तांची नेमणूक करावी

६) अॅट्रॉसिटीच्या कायद्यात दुरुस्ती व्हावी


हेही वाचा – मराठा मोर्चा; दिलेला शब्द पाळा, नाहीतर सत्तेची मस्ती उतरवू

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here