घरताज्या घडामोडी'ED समोरच जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही!'

‘ED समोरच जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही!’

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आज ईडी कार्यालयाने पुन्हा समन्स बजावले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ‘ज्या पद्धतीने किरीट सोमय्या अफाट, बेफाट, तोंडफाट पद्धतीने आरोप करत सुटले आहेत, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री, माझ्या कुटुंबीयांविरोधात आरोप केले. त्यांनी हे आरोप सिद्ध करून दाखवावेत. पण ते सिद्ध केले नाहीत, तर ईडीच्या कार्यालयासमोर हे आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही. तुमच्यासारख्या फडतूस लोकांनी असे आरोप करावेत आणि त्यातून पक्षानं प्रसिद्धी मिळवावी, असं राजकारण आम्ही कधी केलं नाही. पाहुयात, तुम्हीही आहात आणि आम्हीही आहोत’, असं संजय राऊत म्हणाले आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.

औरंगाबादचं नामकरण झालं आहे!

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी सध्या सुरू असलेल्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावर देखील भूमिका स्पष्ट केली. ‘नामांतराची एक प्रक्रिया असते. त्यासाठी केंद्राकडे जावं लागलं. पण मुख्यमंत्री जेव्हा स्वत: एखाद्या शहराचं नाव संभाजी नगर असं घेतात, तेव्हा त्याचं नाव संभाजीनगर झालंय असं आम्ही जाहीर करतो’, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

या ब्लॅकमिलर्सच्या टोळ्यांचं काय?

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. ‘तपास यंत्रणांनी जरूर तपास करावा. पण एखादा राजकीय पक्ष त्यांची वकिली करतो आणि जी गोष्ट ईडी, सीबीआयकडेही नाही, त्याबाबत बाहेर वक्तव्य केली जातात. भाजपच्या सगळ्याच नेत्यांबाबत या गोष्टी घडताना दिसत आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी तसा तपास केलाच पाहिजे. पण या बाहेरच्या लोकांकडे येणाऱ्या माहितीवरून ते समाजातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ब्लॅकमिलर्सच्या टोळ्यांविरुद्ध कोणती भूमिका घेतली जाणार?’ असं ते म्हणाले.

कशासाठी सुरक्षेचे पिंजरे घेऊन फिरायचं?

राज्यातील भाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा काढण्यावरून त्यांनी यावेळी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ‘मला वाटत नाही सुरक्षा काढण्यात काही राजकारण झालं असावं. आमच्याही सुरक्षा याआधी काढण्यात आल्या आहेत. पण आम्ही कधी बोललो नाही. गेल्या वेळी आम्ही सरकारमध्ये होतो. तेव्हा माझीही सुरक्षा काढली गेली. महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळण्याचा, विरोधकांशी सूडबुद्धीने वागावं असा राष्ट्रीय राजकारणातला ट्रेंड महाराष्ट्र सरकारची नाही. त्यामुळे विरोधकांची सुरक्षा काढण्यामागे राजकारण नाही’, असं त्यांनी नमूद केलं. ‘सुरक्षा काढण्याचा निर्णय झाला याअर्थी महाराष्ट्रातं वातावरण सुरक्षित आहे. शरद पवारांनीही सुरक्षा कमी करण्याची विनंती केली आहे. जर महाराष्ट्र सुरक्षित असेल, तर सुरक्षेचे पिंजरे कशासाठी घेऊन फिरायचे. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षेचा अतिरेक आहे. राजकारण्यांनी अधिक मोकळेपणाने फिरायला हवं’, असंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -