अरेच्चा… शिवसेनेला राज्यपाल अचानक पित्यासमान वाटले !

भेटीनंतर खासदार संजय राऊतांकडून स्तुतीसुमने

Mumbai

एकीकडे राज्यात शिवसेना विरुद्ध राज्यपाल असे काहीसे चित्र निर्माण झालेले असतानाच शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शनिवारी अचानक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सामनाच्या अग्रलेखातून तसेच ट्वीटर हँडलवरून संजय राऊत यांनी वारंवार राज्यपालांना लक्ष्य केल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाले आहे. शिवाय, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वेळी देखील राज्यपाल आणि शिवसेनेमधले संबंध ताणले गेले होते. मात्र, राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिलेली प्रतिक्रिया सगळ्यांनाच अचंबित करणारी आहे.

‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांचे संबंध मधूर आहेत. दोघांना एकमेकांचा आदर आहे. त्यांचे पिता-पुत्रासारखे संबंध आहेत. त्यांच्यात दरी वगैरे पडत नाही’. शिवसेनेचा हा यू टर्न राज्यपालांबरोबर पक्षाचे संबंध सुमधूर करण्यासाठी होता की राज्यपालांवर केलेल्या घणाघाती टीकेबद्दल राऊत यांना वैयक्तिक माफी मागायची होती, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी संजय राऊत यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी राज्यपालांचं कौतुक केल्यामुळे देखील सगळ्यांना आश्चर्य वाटले. ‘राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे ही फक्त एक सदिच्छा भेट होती. त्यापलीकडे काहीही नाही. राज्यपाल हे सगळ्यांना प्रियच असतात. ते राज्याचे पालक आहेत. घटनात्मक प्रमुख आहेत. विरोधक कायम इथे भेट देत असतात. विरोधी पक्षनेत्यांचे दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावा, असं म्हटले म्हणजे ती राजभवनावर टीका होत नाही’, असेही यावेळी राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत राज्यपालांना भेटले. त्यानंतर राऊत यांनी कंबरेत ९० अंशाच्या कोनात वाकून राज्यपालांना नमस्कार केल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. राज्यपालांवर सातत्याने टीका करणारे संजय राऊत राज्यपालांसमोर अशा पद्धतीने वाकून नमस्कार करतात, याचे नक्की कारण काय? यावर आता तर्कवितर्क केले जात आहेत. शिवसेनेने राज्यपालांसोबत इतकी नरमाईची भूमिका घ्यावी, यामागे निश्चितच काही तरी राजकारण शिजत असल्याचे बोलले जात आहे.

मातोश्रीचा राऊत यांना फतवा ?

उद्धव ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांचे सुरुवातीपासून चांगले संबंध राहिलेले नाहीत. हे बिघडलेले संबंध आणि त्यावर संजय राऊत यांची जहरी टीका यामुळे राजभवन आणि वर्षा व्हाया मातोश्री यात अंतर पडत चालले होते. भविष्यातील राजकारणाचा विचार करता हे कटू संबंध सरकारला धोकादायक होऊ शकतात, असा विचार करून कदाचित मातोश्रीच्या फतव्यावरून राऊत हे राजभवनवर गेले असतील. यामध्ये कुठे शिवसेना न दिसता राऊत आणि राज्यपाल यांचे मनोमिलन झाले, असे चित्र भासवण्याचा हा एक प्रयत्न असावा, असे दिसते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here