अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला – संजय राऊत

शुक्रवारी संजय राऊत यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले.

Mumbai
sanjay raut
खासदार संजय राऊत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आज पंधरा दिवस झाले. मात्र, तरीही आज राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. मात्र, आता भाजपने हात वरती केले आहेत. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार दररोज प्रसारमाध्यमांसमोर येऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. आज सकाळी पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेत त्यांनी भाजप नेत्यांना किंवा शिवसेना आणि भाजप पक्षांमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला’ असा इशारा दिला आहे.

‘मध्यस्थीसाठी कुणी तिसऱ्याने पडू नये’

गुरुवारी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे उद्धव ठाकरे यांची भेठ घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असला ते म्हणाले, ‘नितीन गडकरी हे मुंबईकर आहेत. त्यांचे निवासस्थान मुंबईत आहे. वरळीत त्यांचे घर आहे. त्यामुळे त्यात काही विशेष नाही.’ त्यानंतर जर गडकरी मातोश्रीवर आले तर? असा प्रश्न विचारला असता गडकरी ‘जर येत असतील तर त्यांनी भाजपकडून मुख्यमंत्रीपदाबाबत लेखी स्वरुपात लिहून आणावे’, असे राऊत म्हणाले. तसेच ‘मुख्यमंत्रीपदाबाबत किंवा सत्ता स्थापनेबाबत कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम आहे. याशिवाय हा विषय फक्त शिवसेना आणि भाजप यांच्यातला आहे. त्यात तिसऱ्याने पडू नये’, असे संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here